कुदळवाडी (Pclive7.com):- रसायनयुक्त पाणी इंद्रायणी नदीत सोडून नदी प्रदूषण केल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेने एका भंगार व्यावसायिकावर कारवाई केली आहे. भंगार व्यावसायिकावर पोलिसात गुन्हा नोंदवत भंगार गोदाम सील करण्यात आले आहे.
रेहान एंटरप्रायजेसचे मालक अब्दुलमलीक अब्दुलजब्बार खान (रा. जाधववाडी, चिखली) याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 278, पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 कलम 15, महापालिका अधिनियम 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी खान याचे कुदळवाडी परिसरात भंगारचे गोदाम आहे. त्याच्या गोदामातून रसायनयुक्त हिरवे लाल रंगाचे सांडपाणी इंद्रायणी नदीत मिसळत असल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत महापालिकेकडून पाहणी करून खातरजमा करण्यात आली. महापालिकेने याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेत भंगार गोदाम सील करत गोदाम मालकावर गुन्हा नोंदवला.
सदर कारवाई सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अभियंता हरविंदरसिंग बन्सल, उप अभियंता योगेश आल्हाट यांचे नियंत्रणखाली आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे व गोरक्षनाथ कर्पे एमपीडब्लु यांनी मेस्को व एमसेफ जवान पथक सह कारवाई करण्यात आली.