पिंपरी (Pclive7.com):- राजा हा राज्याचा धनी नसतो तर तो रयतेचा सेवक असतो, हे शिवरायांनी घालून दिलेले धोरण छत्रपती संभाजीराजेंनी तंतोतंत आचरणात आणले. संभाजीराजांनी आपल्या राज्यात कधी भेदभाव केला नाही.अत्यंत प्रागतिक विचारांचे होते. त्यांनी कर्मकांड, अंधश्रद्धा याला थारा दिला नाही, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केले.
शाहूनगर बर्ड व्हॅली येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी काळे बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संभाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण सचिव रावसाहेब गंगाधरे, उपाध्यक्ष स्वप्निल परांडे, संघटक विलास जाधव, हनुमंत येवले, वैभव काळकुटे, जिजाऊ ब्रिगेडच्या उषाताई पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
काळे म्हणाले की, संभाजी महाराज समतावादी होते. त्यांनी शेतकऱ्यांना न्याय दिला. त्यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले. परचक्रापासून भूमिपुत्रांचे रक्षण करणे, हे त्यांचे ध्येय होते. त्यांनी श्रम करणाऱ्यांचा कैवार घेतला. सर्वसामान्यांचे रक्षण आणि दुर्जनांना कठोर शासन ही त्यांची राजनीती होती. मानवी कल्याणासाठी धर्म असतो, मानवी विकासाला जखडून ठेवणारा धर्म शिवशंभूंना मान्य नव्हता. त्यांनी आपल्या धार्मिक परंपराचा अभिमान बाळगताना परधर्मीयांचा द्वेष केला नाही, परंतु सक्तीने धर्मांतराची मोहीम राबवणाऱ्या धर्मांध औरंगजेबाविरुद्ध ते निर्भीडपणे लढले.
यावेळी शाहूनगर बर्ड व्हॅली येथे वायसीएम हॉस्पिटलच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये काळे यांनी रक्तदान केले.