पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीगाव प्रभाग क्र.२१ मधील पवना नदीवरील मिलेटरी डेअरी फार्म येथील कोल्हापुर पद्धतीचा बंधारा काही वर्षापुर्वी तोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रामध्ये ठिकठिकाणी पाण्याचे डबके तयार होऊन डासांच्या उत्पत्तीचे केंद्र बनत चालले आहे. त्यामुळे याचा त्रास प्रभागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. यावर उपाययोजना म्हणून प्रभागामध्ये जलतरण तलाव, दशक्रिया विधी घाट, संजय गांधी नगर,बालामळ चाळ या परिसरामध्ये ‘मोस्किटो किलिंग’ मशिन तातडीने बसविण्यात यावी अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरीगाव प्रभाग २१ मध्ये डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तरी प्रभागात ‘मोस्किटो किलिंग’ मशिन बसविण्यात यावी अशी मागणी यापूर्वीच केली होती. याबाबतचे पत्र दिनांक २६/४/२०१८ रोजी महापालिका प्रशासनाला देण्यात आले होते. तसेच याबाबतचा ठराव देखील ‘ग’ प्रभाग समिती सभेमध्ये दिनांक ०७/०५/२०१८ रोजी मंजुर करण्यात आला होता. मात्र सदर बाबतीत अद्याप पर्यंत कोणतीच कार्यवाही झाली नसुन प्रभागात डासांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.
प्रभागात धुर फवारणीच्या गाड्याही नियमित येत नाहीत. यामुळे नागरिकांना आरोग्य विषयक अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या गाड्यांची संपूर्ण माहिती आपणाकडे मागवुन घेण्यात यावी. या माहितीद्वारे आरोग्य विभागाचा सुरु असलेला गाफिलपणा आपल्या निदर्शनास येईल. आरोग्य विभाग नागरिकांच्या जिवाशी कशाप्रकारे खेळ करत आहे हे आपल्या लक्षात येईल. ‘मोस्किटो किलिंग’ मशिन बसविण्या बाबतचा ठराव मंजुर होऊन देखील एक वर्ष उलटून सुद्धा कोणतीच अंमलबजावणी झालेली नाही. तरी सदरच्या कामात दफ्तर दिरंगाई करणाऱ्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच तातडीने प्रभागात ‘मोस्किटो किलिंग’ मशिन बसविण्यात यावेत अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.