पिंपरी (Pclive7.com):- पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ऑगस्ट किंवा सप्टेंबर २०२० मध्ये होणार आहे. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांनी गुरुवारी (दि. ९) रोजी पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेतली. नवीन मतदार नोंदणीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागातील २०१६ पर्यंत पदवीधर झाल्याचा सर्व्हे करावा, असा आदेश यावेळी दिला आहे.
भाजप पक्ष कार्यालयात नगरसेवकांची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राधिकरणचे अध्यक्ष सदाशिव खाडे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, महापौर राहुल जाधव स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, पक्षनेते एकनाथ पवार, अमोल थोरात, पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
पदवीधर मतदार नाव नोंदणी ही सहा वर्षांनी नवीन करावी लागते. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागात स्वतः किंवा कार्यालयातील लोकांच्या मदतीने संबंधित पदवीधरांचा फोटो, पूर्ण पत्ता, गुणपत्रिकेची छायांकित प्रत किंवा शेवटच्या वर्षाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत ही सर्व माहिती गोळा करून त्याचा डाटा बनवावा. याचा फायदा जसा पदवीधर निवडणुकीत होणार आहे, त्याचप्रमाणे तो येणाऱ्या विधानसभा व भविष्यातील महापालिका निवडणुकीसाठी उपयोगी ठरणार असल्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी यावेळी सांगितले.