पिंपरी (Pclive7.com):- केंद्रीय हरित प्राधिकरणामार्फत मंगल कार्यालयांना मोठ्या प्रमाणात घनकचरा निर्माण करणाऱ्या संस्था म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे सर्व मंगल कार्यालयांना त्यांच्यामार्फत निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन त्यांच्या स्तरावर करण्याबाबत प्राधिकरणाने आदेश दिले आहेत. त्यामुळे मंगल कार्यालयांमध्ये निर्माण होणारा ओला कचरा कार्यालय स्तरावर विघटन करण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबतची नोटीस आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी काढली आहे. तसेच, आरोग्य ना हरकत दाखला (हेल्थ एनओसी) घेण्याबाबत अथवा त्याचे नूतनीकरण त्वरीत करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महापालिकेतर्फे शहरातील मंगल कार्यालयांना हेल्थ एनओसी देण्यात येते. तसेच, संबंधित एनओसीचे दरवर्षी नूतनीकरण करणे संबंधितांना बंधनकारक केलेले आहे. तथापि, कार्यालयांकडून हेल्थ एनओसी न घेणे, त्याचे नूतनीकरण न करण्याचे प्रकार समोर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, शहरातील सर्व मंगल कार्यालयांसाठी ही नोटीस काढण्यात आली आहे. मंगल कार्यालयांमध्ये महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण नियमावलीनुसार (डीसीआर) वॉश बेसिन, टॉयलेट ब्लॉक्स, पुरूष आणि महिलांसाठी मुतारी बांधणे देखील आवश्यक आहे. तसेच, त्या सुस्थितीत ठेवणे गरजेचे आहे. संबंधितांनी ही व्यवस्था केली नसल्यास तशी व्यवस्था करावी. अन्यथा, संबंधित कार्यालयांविरूद्ध महापालिका आरोग्य विभागातर्फे कारवाई करण्यात येणार आहे.
घनकचरा व्यवस्थापन अधिनियमाच्या तरतुदीनुसार मंगल कार्यालयात निर्माण होणारा कचरा शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्याची यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक आहे. संबंधित बाबींची पुढील १५ दिवसांमध्ये पूर्तता करण्यात यावी, असे डॉ. रॉय यांनी नोटीसमध्ये नमूद केले आहे.
मंगल कार्यालयांकडे पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसल्याने बऱ्याचदा रस्त्यावरच वाहने लावली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. रस्त्यावरच लावण्यात येणाऱ्या वाहनांच्या बाबतीत मध्यंतरी वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर, आरोग्य विभागाने काढलेल्या नोटीसमुळे मंगल कार्यालयांना आता आरोग्याच्या बाबतीत देखील जागरूक राहावे लागणार आहे.
























Join Our Whatsapp Group