पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीनंतर शहरात अनधिकृत बॅनर आणि फ्लेक्सबाजी मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. तरी हे अनधिकृत फ्लेक्स आणि बॅनर तात्काळ हटवण्याची कारवाई करावी अशी मागणी विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

आमदार अमित गोरखे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली असून, निवडणुकीनंतर शहरात अनधिकृत बॅनर, पोस्टर व फ्लेक्स मोठ्या प्रमाणावर लावण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे. विजयी उमेदवार तसेच विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या आनंदात शहरातील प्रमुख चौक, रस्ते, उड्डाणपूल, सिग्नल परिसर व इतर सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाहिराती लावल्यामुळे शहराच्या सौंदर्यावर परिणाम होत आहे. या अनधिकृत बॅनर व फ्लेक्समुळे सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण होत असून काही ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचेही दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्वच्छ, सुंदर व नियोजनबद्ध शहर म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रतिमेला अशा अनधिकृत जाहिराती बाधा पोहोचवत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व अनधिकृत बॅनर, पोस्टर व फ्लेक्स तात्काळ हटविण्यात यावेत अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे.
महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने याबाबत त्वरित कारवाई करून शहरातील अनधिकृत जाहिराती काढून टाकाव्यात, जेणेकरून शहराची सुव्यवस्था व सौंदर्य कायम राहील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.






















Join Our Whatsapp Group