पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाने भाजपासोबत बिनशर्त युती करत निवडणूक लढवली होती. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात भाजपाच्या पाठीशी उभा राहिला. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांसोबत खांद्याला खांदा लावून प्रचार करत निवडणूक लढवली, त्यामुळेच भाजपाला घवघवीत यश मिळाल्याचे मत आरपीआय (आठवले) शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी व्यक्त केले आहे.

महापालिका निवडणुकीदरम्यान भाजपाने आरपीआय (आठवले) गटासाठी पाच जागा सोडल्या होत्या. विशेष बाब म्हणजे या सर्व जागांवर आरपीआयच्या उमेदवारांनी भाजपच्या ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवली. त्यापैकी दोन जागांवर आरपीआयचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, तर उर्वरित तीन जागांवर अत्यंत निसटता पराभव स्वीकारावा लागला.
महापौर पदासाठी अनुसूचित जाती (एससी) आरक्षण पडेल, अशी अपेक्षा आंबेडकरी समाजाला होती. मात्र यावेळी महापौर पद सर्वसाधारण आरक्षणासाठी राखीव झाल्याने अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सध्या भाजपकडून अनेक इच्छुक महापौर पदासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र आरपीआय (आठवले) समर्थकांची एकमुखी मागणी आहे की, युतीधर्म जपत महापौर पद आरपीआयला देण्यात यावे अशी भावना कुणाल वाव्हळकर यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, कुणाल वाव्हळकर यांनी स्वतः महापौर पदासाठी इच्छा व्यक्त केली आहे. “भाजपाने मोठे मन दाखवून यावेळी महापौर पदासाठी मला संधी द्यावी,” अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे. युतीत दिलेल्या योगदानाची योग्य दखल घेण्यात यावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.






















Join Our Whatsapp Group