पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण (वायसीएम) रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन युवासेनेच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख मेट्रन परिचारिका मोनिका चव्हाण, असिस्टंट मेट्रन माया गायकवाड, पिपंरी चिंचवड नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षा सविता निगडे, सुपर सिस्टर पुष्पा लाड, विजया रोकडे व स्मिता शेटे यांच्यासह सर्व परिचारिकांचा सन्मान युवासेनेच्या वतीने करण्यात आला.
यावेळी युवा सेनेचे जिल्हा समन्वयक जितेंद्र ननावरे, पिपंरी विधानसभा युवा अधिकारी अभिजित गोफण, पिपंरी विधानसभा युवती अधिकारी प्रतीक्षा घुले, चिंचवड युवती अधिकारी शर्वरी जळमकर, नीलेश हाके, निखिल येवले पाटील, वंदना खंडागळे, सन्नी कड, पुरू पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक बाबा वानखेडे तसेच शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना युवासेनेचे पुणे जिल्हा समन्वयक जितेंद्र ननावरे म्हणाले की, आजच्या धावपळीच्या काळात रूग्णालयात सर्वांनाच तातडीची सेवा हवी असते. डॉक्टरांनंतर रुग्णाची सेवा जर कोणी करत असेल, तर त्या परिचारिकाच करतात. रुग्णांना सेवा अतिशय चोखपणे देण्याचे काम परिचारिका करत असतात. पण तरीही शासकीय रुग्णालयात खुप काम करूनही त्यांच्यावर रुग्णाचे नातेवाईक व राजकीय मंडळी काम करत नसल्याचे खोटे आरोप करत असतात. पण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्या मोठ्या आदराने रुग्णसेवा करत असतात. आज जागतिक माता दिवस व परिचारिका दिवस एकत्र आहे. यात माता आणि परिचारिका दोघीही प्रेमाचा आणि वात्सल्याचा झरा अविरत तेवत ठेवत समान कर्तव्य पार पाडत असतात. त्यामुळे त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहे. परिचारिकांना काही अडचण असल्यास युवासेना नेहमीच परिचारिकांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असे सांगून जागतिक परिचारिका दिनाच्या जितेंद्र ननावरे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी आभार व्यक्त करताना यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या प्रमुख मेट्रन मोनिका चव्हाण म्हणाल्या की, आमच्या कामाच कौतुक करणारी लोकं फार कमी असतात. आमच्या कामाच्या प्रति असलेल्या तळमळीची पिंपरी चिंचवड युवासेनेने जाणीव ठेवत आमचा सत्कार केल्यामुळे आम्हाला अजुन चांगली रुग्णसेवा करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.