पिंपरी (Pclive7.com):- तीन मुलांना गळफास देऊन खून करून महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भोसरीमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेमुळे भोसरीत खळबळ उडाली असून महिलेने मुलांचा खून करून आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकले नाही.
घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ही घटना आज (रविवार) सायंकाळी उघडकीस आली. अलफिया बागवान (वय-९), झोभा बागवान (वय-७), जिआन बागवान (वय-६) असे खून करण्यात आलेल्या तीन मुलांची नावे असून फतिमा अक्रम बागवान (वय-२८) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून, फतिमा बागवान या महिलेने राहत्या घरामध्ये आपल्या तीन मुलांचा गळफास लावून खून केला. त्यानंतर तिने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. फातिमाचा पती अक्रम काहीच कामधंदा करत नसल्याने तिने हे पाऊल उचलले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात आणण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.