पिंपरी (Pclive7.com):- डॅशिंग पर्सनॅलिटी असलेल्या नाना काटे यांनी आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपावर त्यांनी हल्लाबोल केला. एकेकाळी ‘बेस्ट सिटी’ म्हणून ओळख असलेल्या शहराची भाजपाने ‘वेस्ट सिटी’ केली आहे. संपूर्ण शहर कचरामय झाले असून सत्ताधारी आणि प्रशासनाला वटणीवर आणून शहर स्वच्छ करणार असल्याची प्रतिक्रीया नाना काटे यांनी दिली.
यावेळी माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, महिला अध्यक्ष वैशाली काळभोर, नगरसेविका मंगला कदम, उषा वाघेरे, सुलक्षणा शिलवंत-धर, शितल काटे, नगरसेवक जावेद शेख, मोरेश्वर भोंडवे, राजू बनसोडे, आजी-माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाना काटे म्हणाले की, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजितदादा यांनी माझ्यावर विश्वास ठेवून विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली. नक्कीच या पदाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी केलेल्या चुकीच्या कामा विरोधात आवाज उठवणार आहे. शहरात सध्या कचऱ्याचे साम्राज्य झाले आहे. सत्तेत असताना राष्ट्रवादीने शहराला ‘बेस्ट सिटी’चा पुरस्कार मिळवून दिला होता. मात्र आता या सत्ताधारी भाजपाने शहराची ‘वेस्ट सिटी’ करून टाकली आहे. सत्ताधारी आणि प्रशासनाला वटणीवर आणून शहर पुन्हा स्वच्छ करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे. राष्ट्रवादीने हाती घेतलेले पवना बंद पाईपलाईन योजना पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार जेणेकरून पिंपरी-चिंचवड वासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे.
सत्तेत येण्यापूर्वी भाजपने शास्तीकर, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सोडवून अशा खोट्या गाजरांची आश्वासने शहरवासियांना दिली होती. त्याविरोधात देखील आपण आवाज उठवणार आहोत. प्राधिकरण बाधितांना संपूर्ण साडेबारा टक्के परतावा मिळाला पाहिजे, या भूमिकेवर ठाम राहणार तसेच आगामी विधानसभेकरिता पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही मतदारसंघात राष्ट्रवादीचाच आमदार होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पुढे ते म्हणाले की चिंचवड विधानसभेतून मी इच्छुक आहे. माझ्यासह अनेकांनी मुलाखती दिल्या आहेत. पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेईल तो मान्य असेल असे ते म्हणाले.