पुणे (Pclive7.com):- कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पुण्यात आठ ठिकाणी संचारबंदी करण्यात यावी असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा धोका पाहता संचारबंदीचा लागू करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठवण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग आजपासून दि.१६ पासून तीन दिवस बंद राहणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व्यापारी असोसिएशने हा निर्णय घेतला आहे.
पुण्यातील तुळशीबाग हे विविध प्रकारच्या वस्तूंच्या खरेदीसाठी महिलांचे आवडीचे ठिकाण आहे. तुळशीबागेतील ग्राहकांची गर्दी लक्षात घेऊन, हा निर्णय घेण्यात आला आहे. विश्रामबाग पोलिसांनी व्यापारी असोसिएशनला केलेल्या आवाहनाला असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद देत हा निर्णय घेतला आहे.
पुण्यात आजपासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण
तसेच, पुण्यात आजपासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी पालिकेने १२५ पथकं तयार केली असून एका पथकामध्ये ३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. परदेशातून पुण्यात आलेल्या नागरिकांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये कोरोनाची माहिती आणि वैद्यकीय सल्ला देण्याचे कामही पथक करणार आहे.