पिंपरी (Pclive7.com):- कोरोना विषाणूमुळे देशासह महाराष्ट्रातील नागरिक भयभित झाले आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी लागणारी प्रतिबंधक साधन सामग्रींची स्थानिक प्रशासनाकडे कमतरता आहे. यामध्ये सॅनिटायझर तसेच मास्क स्थानिक पातळीवर म्हणजेच जिल्हा रुग्णालये, महापालिका दवाखाने आदी ठिकाणी मोफत उपलब्ध करून देणे हे राज्य सरकारचे आद्य कर्तव्य आहे. कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारने पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना सॅनिटायझर व मास्क कमी दरात किंवा मोफत स्वरूपात उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी भाजपा नगरसेवक उत्तम केंदळे यांनी केली आहे.
यासंदर्भात नगरसेवक उत्तम केंदळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, राज्यावर कोरोनाचे मोठे संकट ओढावले आहे. पिंपरी चिंचवड शहरात तर सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. कोरोना विरोधात मुकाबला करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र राज्य सरकारकडून शहरातील सर्वसामान्य व गरीब नागरिकांना परडवेल या दरात सॅनिटायझेर व मास्क किमान पंधरा दिवसासाठी कमी दरात किंवा मोफत उपलब्ध करून देण्यात यावेत. राज्य सरकारने कमी दरात अथवा मोफत सॅनिटायझर व मास्क पुरवावेत अशी मागणी नगरसेवक उत्तम केंदळे यांनी केली आहे.