पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच सर्व पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांना प्रांत पोलीस मित्र संघाच्यावतीने ‘मोफत मास्क’चे वाटप करण्यात आले.
पोलिस हा वर्दीतील एक माणूसच आहे, या भावनेने कोरोना व्हायरस आपल्या शहरात पसरू नये व त्याचे जास्त रुग्ण होऊ नये, यासाठी पोलीस आपल्या जीवाचे रान करीत आहेत. संपूर्ण जगभरामध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. ह्या परिस्थितीत शहरातील शाळा, महाविद्यालयासह सर्व दुकाने तसेच कंपन्या बंद ठेवण्यात आल्यात. बाजारपेठ बंद आहे. परंतु महाराष्ट्र पोलीस व डॉक्टर्स यांचे कार्य मात्र सातत्याने सुरू आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यात डॉक्टरांसह पोलीसांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे अनेक नागरिकांच्या संपर्कात पोलीस येत असल्याने प्रांत पोलीस मित्र संघाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या स्वतःच्या परिवाराची सुरक्षा तितकीच महत्त्वाची आहे हे ओळखले. या जाणिवेने संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक विभाग व पोलीस स्टेशन या ठिकाणी मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. प्रांत पोलीस मित्र संघाच्या या विधायक कार्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी आभार मानले.
यावेळी प्रांत पोलीस मित्र संघाचे अध्यक्ष गोपाळ बिरारी, प्रदेशाध्यक्ष संपत बोराटे, पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर शिंदे, शांतता कमिटी प्रमुख सुभाष मालुसरे, डॉल्फिन अकॅडमीचे संस्थापक संदीप पोलकम, गणेश नवरे, पिंपरी चिंचवड सचिव राजेश बिराजदार, पिंपरी चिंचवड प्रमुख दत्ता भोई आदी मान्यवरांच्या हस्ते मास्कचे वाटप करण्यात आले.