पिंपरी (Pclive7.com):- तुमच्या नावाने इराण येथे पार्सल जात असून त्यामध्ये ड्रग्ज आहेत, असे सांगून महिलेची २४ लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने चार आरोपींना अहमदनगर, जळगाव आणि सुरत येथून अटक करण्यात आली आहे.
स्वरूप अशोक खांबेकर (वय ४२, रा. कोपरगाव, जि. अहमदनगर), पुष्कर चंद्रकांत पाखले (रा. जळगाव), मोनीक भरतभाई रंगोलीया आणि कौशिक मनसुखभाई बोरड (दोघेही रा. सुरत) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. बाणेर येथील ३८ वर्षीय महिलेने याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/08/IMG-20240806-WA0031-300x150.jpg)
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अज्ञात मोबाइल क्रमांक धारकाने फिर्यादी महिलेला फोन केला. तो फेडेक्स कुरीअर कंपनीतून बोलत सांगितले. तुमचे इराणला कुरिअर जात आहे. त्यामध्ये ड्रग्ज आहे, असे सांगत तुमचा कॉल नार्कोटिक्स विभागाला ट्रान्सफर करतो असे म्हणत आरोपीने कॉल दुसऱ्या आरोपीला जोडला. दुसऱ्या आरोपीने ते पार्सल कस्टमवाल्यांनी अटकवून ठेवल्याचे सांगितले. त्यासाठी तुम्हाला मुंबई येथे येऊन ते तुमचे पार्सल नाही हे क्लियर करावे लागेल किंवा ऑनलाइन स्काइप ॲपवरून बोलून क्लियर करावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर स्काइप ॲपच्या माध्यमातून फिर्यादी महिलेच्या मोबाइलच्या स्क्रिनचा ॲक्सेस मिळवला. महिलेच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. आणि वेगवेगळ्या कारणांसाठी महिलेकडून २४ लाख ९९ हजार ९९८ रुपये बँक खात्यावर घेतले.
त्यानंतर सायबर पोलिसांनी आरोपींच्या बँक खात्याची माहिती मिळवली. त्याद्वारे आरोपीची ओळख पटवून त्याला अहमदनगरमधून ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास करत त्याच्या इतर तीन साथीदारांची माहिती घेऊन त्यांनाही जळगाव आणि सुरत येथून ताब्यात घेतले. आरोपींनी वापरलेल्या एसबीआय बँकेच्या खात्यावर दोन कोटी रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार झाले आहेत. त्या खात्याबाबत भारतातून ६८ तक्रारी आल्या असल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अनिल देवडे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, पोलीस अंमलदार दीपक भोसले, अतुल लोखंडे, नितेश बिचेवार, सौरभ घाटे, श्रीकांत कबुले, स्वप्नील खणसे यांनी केली.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240624-WA00001-300x300.jpg)