Paris Olympics 2024 (Pclive7.com):- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं चौथं पदक निश्चित झालं आहे. भारताची धाकड कुस्तीपटू विनेश फोगटने कुस्तीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. ५० किलो कुस्तीच्या उपांत्य फेरीत विनेश फोगटचा सामना क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझशी झाला. या सामन्यात विनेश फोगटने ५-० असा विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे. अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर तिने भारताचे सुवर्ण किंवा रौप्य पदक निश्चित केले आहे.
उपांत्य सामन्यात विनेश फोगटने पहिला गुण मिळवला होता. पहिल्या फेरीत विनेश फोगटने क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझला एकही संधी दिली नाही. क्युबाच्या लोपेझने विनेश फोगटच्या पायांवर सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, परंतु विनेश फोगटच्या चांगल्या बचावामुळे तिला गुण मिळवता आला नाही. यानंतर विनेश फोगटने सलग दोन गुण घेत सामन्यात ५-० अशी आघाडी घेतली. सामन्याच्या अखेरीस युस्नेलिस गुझमन लोपेझने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु विनेश फोगटने तिला कोणतीही संधी दिली नाही आणि एकतर्फी विजय मिळवला.
विनेश फोगटने उपांत्यपूर्व फेरीत उत्कंठावर्धक लढतीत युक्रेनच्या ओसाना लिवाचचा ७-५ असा पराभव केला. याशिवाय पहिल्या सामन्यात तिने जपानच्या युई सुसाकीचा ३-२ असा पराभव केला. चार वेळा विश्वविजेत्या सुसाकीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
विनेशने ऑलिम्पिक वगळता प्रत्येक मोठ्या खेळात पदके मिळवली आहेत. यामध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये एक सुवर्ण, एक आशियाई स्पर्धेतील विजेतेपद, वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील दोन कांस्यांसह आशियाई चॅम्पियनशिपमधील आठ पदकांचा समावेश आहे. मात्र, तिला रिओ आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकता आले नाही. विनेश फोगट, हिने गेल्या वर्षी मॅटपासून बराच काळ दूर होती आणि भारताचे माजी कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण सिंग शरण यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर त्यांच्या विरोधात आंदोलन केले.