महेश लांडगेंसह कुटुंबियांना क्वॉरंटाईन केल्यामुळे शहरवासीयांची चिंता वाढली..!
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे अध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त ‘वायु’वेगाने व्हायरल झाले. त्यामुळे समाजमाध्यमांवर ‘महेशदादा Get Well Soon’, दादा लवकर बरे व्हा…आमचा पैलवान कोरोनावर मात करणारच…अशा आशयाच्या पोस्ट्सचा सोशल मीडियावर महापूर ओसंडला आहे. समर्थक, नागरिकांनी भावनिक होवून महेश लांडगेच्या आरोग्यासाठी प्रार्थना- सदिच्छा सुरू केली आहे.
कोरोना विषाणुची चर्चा आणि लॉकडाउन सुरू झाले त्यावेळी त्यावेळी शहरात सात-आठ रुग्ण दररोज सापडत होते. त्यावेळी पिंपरी चिंचवड शहराला आपण कोरोनामुक्त करु…त्यासाठी आहोत जिथे…आहोत जसे…हरवुया अंधाराला…असे स्फूर्तीगीत पिंपरी चिंचवडकरांसाठी घेवून येणारे आमदार तथा भाजपाचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनाच कोरोनाची बाधा झाली. लोकांना आधार देता-देता स्वत: आमदार लांडगे कोरोनामुळे जायबंदी झाले. त्यामुळे अनेकांची हळहळ होत आहे. त्यातच सोशल मीडियावर पुन्हा एकदा ‘आहोत जिथे…आहोत जसे…हरवुया अंधाराला’ हे गीत व्हायरल होवू लागले. त्यामधील फोटो आमदार लांडगेंचे आहेत. त्यामुळे समर्थक आणि आप्तेष्ठांचे डोळे काळजीपोटी पानावले आहेत.
दरम्यान, आमदार लांडगे यांच्या पत्नी पुजा लांडगे यांचा कोरोना रिपोर्टही पॉझिटीव्ह आला आहे, असे वृत्त आहे. संपूर्ण लांडगे कुटुंबियांना क्वारंटाईन केल्याचे समजते. त्यामुळे संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यातील विविध क्षेत्रातून आमदार लांडगेंच्या प्रकृतीची विचारपूस होत आहे.
आमदार महेश लांडगे यांचे नागरिकांना आवाहन…
आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवड शहरवासीयांना आवाहन करताना म्हटले आहे की, हो हे खरे आहे.. मला कोरोनाची बाधा झाली आहे. माझ्यावर चिंचवड येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मागील अनेक दिवसांपासून शहराचा कोरोना आलेख कमी करण्यासाठी व महत्त्वाची विकासकामे यासाठी मिटिंग घेणे. विविध ठिकाणी भेटी देणे सुरूच होते. पण, हरकत नाही कोरोनासोबत जगणे स्वीकारले पाहिजे.