पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. कोरोनाच्या संकटकाळात गेल्या सहा महिन्यापासून ते सर्वसामान्य, गरजू नागरिकांना तसेच कोरोनाबाधित रूग्णांना पूर्णपणे मदत करत होते. याच काळात २७ ऑगस्ट रोजी त्यांचा कोरोनाचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला होता. त्यानंतर सुरूवातीला एका खाजगी रुग्णालयात उपचार आणि त्यानंतर ‘होम आयसोलेशन’मध्ये ते होते. प्रबळ इच्छाशक्ती आणि शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करत नाना काटे यांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोना सारख्या आजाराला हरवल्यानंतर नाना काटे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट प्रसारित केली आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १३ महिन्याच्या विरोधी पक्षनेते पदाच्या कार्यकाळातील साडेपाच महिने कोरोना महामारी विरुद्ध शहराचा एक लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करण्याचा योग आला. यादरम्यान सर्व ‘प्रोटोकॉल’ पाळले. मात्र कर्तव्य बजावताना मला ही कोरोनाची लागण झाली. २७ ऑगस्ट रोजी कोरोनाची चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली.
शासनाच्या दिशानिर्देशानुसार नियमांचे पालन करत आयसोलेशन पिरियड सुरु झाला. चाचणीचा निकाल आला. घरीच असल्याने मनात विचारांचे काहूर सुरू झाले. मात्र कुठल्याही नकारात्मक विचारांना थारा न देता सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. कारण कोरोनाच्या ‘पॉझिटिव्ह’ चाचणीवर मात करायची असेल तर विचारांची सकारात्मकता आवश्यक आहे. ही सकारात्मकता प्रबळ इच्छाशक्ती आणि आपल्या शुभेच्छांचा जोरावर आज कोरोनावर पूर्णपणे मात करणे शक्य झाले. समाजातील दुष्प्रवृत्ती आणि विचारांवर मात करणाऱ्यासाठी सुद्धा या गोष्टी आवश्यक आहे. प्रत्येकाने आपली दांडगी इच्छाशक्ती, सकारात्मक विचार आणि ध्येयनिश्चितीच्या जोरावर समाजात सकारात्मकता पसरावी, हीच सदिच्छा.
चला समाजात सकारात्मकता रुजवण्यासाठी समविचारी आणि प्रबळ इच्छाशक्ती बाळगणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊया..!
जय हिंद..!
आपलाच – नाना काटे