पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्र २८ रहाटणी-पिंपळे सौदागर मधील विविध सोसायटींमधील खासगी सफाई कामगार, घर कामगार, सुरक्षा रक्षक, व बांधकाम कामगार यांच्यासाठी दोन दिवसीय लसीकरण मोहीम आयोजित करावे अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.
यासंदर्भात नाना काटे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे महाराष्ट्र शासन निर्देशानुसार लस उपलब्धेनुसार वय वर्षे १८ पुढील सर्व नागरिकांचे शहरात लसीकरण करण्यात येत आहे. तसेच शहरातील खासगी रुग्णालयामध्ये देखील शासन निर्देशानुसार लसीकरण करण्यात येत आहे.
प्रभाग क्र. २८ रहाटणी-पिंपळे सौदागर येथे रहिवासी सोसायटी संख्या जास्त आहे. येथे घर काम करणारे घर कामगार, खासगी सफाई कामगार, सुरक्षारक्षक यांची संख्या देखील जास्त आहे. तसेच येथे नव्याने रहिवासी बांधकामे मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. अश्या बांधकाम साईटवर काम करणारे देखील अनेक कामगार आहेत.
यातील बहुतेक नागरिकांकडे स्मार्ट फोन नाहीत. कोणतेही ओळखपत्र नाही व अनेकजण अशिक्षित असल्याने त्यांना ऑनलाइन नोंदणी करता येत नाही व हातावर पोट असल्याने त्यांना खासगी लसीकरण केंद्रावर जावून लस घेणे शक्य नाही. त्यामुळे अश्या नागरिकांचे लसीकरण राहिले आहे. या कामगारांचा कामाच्या ठिकाणी एक ना अनेक लोकांशी वारंवार संपर्क येत त्यामुळे त्यांचे लसीकरण करणे महत्वाचे आहे.
शहरातील करोना प्रसार रोखण्यासाठी करोना प्रतिबंधित लस घेणे हे प्रभावी अस्त्र आहे. त्यामुळे या लोकांसाठी रहाटणी-पिंपळे सौदागर या प्रभागात दोन दिवसीय लसीकरण कॅम्प आयोजित करून संबधित नागरिकांचे लसीकरण करून देण्यात यावे अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.