पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतलेले अनेक निर्णय तसेच विविध धोरणांविरोधात ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन ‘एमआयएम’ पक्षाने आवाज उठवला आहे. विविध मागण्यासंदर्भात पिंपरी चिंचवड महापालिका भवनासमोर मंगळवारी (दि.१०) रोजी सकाळी ११ वाजता ‘महापालिका जागो घंटा नाद आंदोलन करण्यात येणार आहे.
‘एमआयएम’ पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा प्रदेश महासचिव अकिल मुजावर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे. यावेळी पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे, शहर सचिव कुतूबुद्दीन होबळे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रुहिनाज शेख, वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष इरफान नैसर्गी तसेच सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेने कोविड बाधित रुग्णांना वैद्यकीय मदत देण्यासाठी कॉल सेंटर सुरू केले आहे. खाजगी तत्वावर सुरु केलेल्या या कॉल सेंटरची सखोल चौकशी होईपर्यंत बील अदा करू नये अशी मागणी करण्यात आली आहे. पवना नदीचे दोन भिन्न बनावट नकाशा बनविणा-या दोषी अधिका-यांस निलंबित करुन खातेनिहाय चौकशी करावी, तसेच ऐन पावसाळ्यात जाधववाडीतील नैसर्गिक नाल्याचा मार्ग बदलण्यात आला आहे. हा मार्ग बदलणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी एमआयएमच्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान कोरोनामुळे गेल्या वर्षापासून सरकारने लॉकडाऊन लागू केला होता. त्यामुळे सर्वसामान्य माणसाची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. त्यातच महापालिकेकडून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांवर जाचक ‘पे अँड पार्किंग’ पॉलिसी लादण्यात आली आहे. त्यामुळ हे ‘पे अँड पार्किंग’चे धोरण रद्द करण्यात यावे, अशा विविध मागण्यासाठी एमआयएमचे आंदोलन होणार आहे.