‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’, मास्क नसेल तर पोलीसांकडून दंडात्मक कारवाई होणार
पुणे (Pclive7.com):- मुंबई, ठाणे, नवी मुंबई पाठोपाठ आता पुण्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज कोरोनास्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी वरील निर्णय जाहीर केलाय. या निर्णयानुसार पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील १ ली ते ८ वी पर्यंतच्या शाळा बंद राहणार आहेत. या वर्गांचे ऑनलाईन क्लास सुरु राहतील. तर ९ वी आणि १० वीचे वर्ग हे ऑफलाईन पद्धतीनेच सुरु राहतील असं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.
कोरोनाची स्थिती बिकट होत आहे. पुणे जिल्ह्यात ७४ टक्के लोकाचं लसीकरण झालं आहे. राहिलेल्या नागरिकांनी लवकर लस घ्यावी. लोकांना विनंती आहे की कठोर निर्णय लागू करण्यास भाग पाडू नका, असं आवाहन अजित पवार यांनी नागरिकांना केलंय. तसंच पुणे शहरात पॉझिटिव्हिटी रेट १८ टक्के झाला आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. पुणे शहरात ३ हजार ९५० सक्रीय रुग्ण आहेत. १५ ते १८ वयोगटातील मुलांचं ४ टक्के लसीकरण झालं आहे. पालक आणि विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.
‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’
वेगवेगळ्या डिझाईनचे कापडी किंवा २ प्लायचे सर्जिकल मास्क वापरू नका. N95 किंवा ३ प्लाय असलेल्या मास्कचाच वापर करा. पुण्यात उद्यापासून मास्क नसेल तर ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. तर मास्क नसताना थुंकल्यावर १ हजार रुपये दंड आकारला जाईल. त्याचबरोबर उद्यापासून पुणे जिल्ह्यात सर्वत्र मॉल, खासगी तसंच सरकारी कार्यालयात कोरोना लसीचे दोन्ही डोस झाले नसतील तर प्रवेश मिळणार नाही. नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस खात्याला सक्त सूचना दिल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.