पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेची पंचवार्षिक मुदत संपुष्टात आल्याने सोमवारपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेतही प्रशासकीय राजवट अस्तित्वात आली आहे. तरी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने अजित पवार यांचाच येथे एकछत्री अंमल राहील, असे चित्र आहे. निवडणुका होईपर्यंत महापालिकेचा कारभार तांत्रिकदृष्ट्या आयुक्त राजेश पाटील यांच्या हाती राहणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकांसाठी प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रशासनाने प्रारूप प्रभागरचना तयार करून त्यावर हरकती, सूचना मागविल्या होत्या. त्यावर नुकतीच सुनावणी घेऊन ती अंतिम मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविली आहे. असे असले तरी पिंपरी-चिंचवड महापालिकेची पंचवार्षिक मुदत १३ मार्च रोजी संपुष्टात आली. या मुदतीत महापालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे महापालिकेवर प्रशासकीय राजवट आजपासून लागू झाली आहे.
महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिरानानी घुले, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, सभागृहनेते नामदेव ढाके यांच्यासह महापालिकेतील पदाधिकऱ्यांनी महापालिकेची वाहने प्रशासनाकडे जमा केली आहेत. तसेच पदाधिकाऱ्यांनी महापालिकेची सुरक्षा व्यवस्थाही परत केली आहे. महापालिका पदाधिकाऱ्यांच्या दालनात सकाळपासून ते सायंकाळपर्यंत कार्यकर्त्यांची तसेच विविध कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांची रीघ असायची. परंतु, सोमवारपासून शुकशुकाट पाहायला मिळेल. महापालिका आयुक्त राजेश पाटील हे प्रशासक म्हणून महापालिकेचे कामकाज पाहणार आहेत.
अजितदादांच्या अंमलाखाली राजेश पाटील घेतील निर्णय
पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाली असली तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा महापालिकेवर एकछत्री अंमल लागू होणार आहे. महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाल्याने येथील कारभारात अजितदादांचा शब्द प्रमाण मानला जाणार आहे. विद्यमान आयुक्त राजेश पाटील हे ओरिसा राज्य सेवेतील सनदी अधिकारी असून, पाच वर्षांच्या प्रतिनियुक्तीने ते महाराष्ट्रात आले आहेत. त्यांना महापालिका आयुक्तपदी आणण्यात अजितदादांचा आग्रह होता. त्यामुळे ते अजितदादांच्या अंमलाखाली निर्णय घेतील, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. राजेश पाटील यांच्या माध्यमातून अजितदादा राष्ट्रवादीचा वरचष्मा ठेवतील, अशी अटकळ बांधली जात आहे.