पिंपरी (Pclive7.com):- गुढीपाडवा हिंदू नववर्षांनिमित्त संस्कृती संवर्धन व विकास महासंघ, पिंपरी चिंचवड यांच्या वतीने दरवर्षी फुलेनगर, संभाजीनगर, शाहूनगर या परिसरातून भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते. परंतु मागील दोन वर्षे कोरोना निर्बंध असल्याने शोभायात्रा रद्द करण्यात आली होती. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने सरकारने सर्व निर्बंध हटवले आहे. त्यामुळे यावर्षी दोन वर्षानंतर भव्य दिव्य शोभायात्रा काढता आली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग घेतला.
आज संध्याकाळी पाच वाजता श्री गणपती मंदिर फुलेनगर येथून शोभायात्रेला सुरुवात झाली. सुरुवातीला ढोल ताशाच्या गजरात मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक झाले. त्यानंतर श्री तुळजाभवानी मंदिर मार्गे, श्री रामेश्वर मंदिर, श्री दत्त मंदिर, स्वयंभु श्री गणपती मंदिर संभाजीनगर मार्गे, सुबोध विद्यालय, श्री सिद्धिविनायक मंदिर, शिवशंभो गार्डन जवळून काका हलवाई, शिवशंभो फाउंडेशन मार्गे महाबली मंदिर शाहूनगर मार्गे महालक्ष्मी मंदिर येथे शेवटचे मर्दानी प्रात्यक्षीक करून शोभायात्रेचा समरोप झाला.
शोभायात्रेत सहभागी सर्व नागरिकांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य दिसून येत होते. प्रत्येकानी भगवा फेटा परिधान केला होता. यामध्ये छोटे बालक वेगवेगळ्या वेशभुषात आले होते. कोणी श्रीराम, लक्ष्मण,सीता, कोणी छत्रपती शिवाजी महाराज, कोणी झांशीची राणी, मासाहेब जिजाऊ, लहानापासून ते ज्येष्ठ नागरिक सर्व यामध्ये सहभागी झाले होते. यानिमित्त समाज प्रबोधनात्मक संदेश, आपली संस्कृती चालीरीती कश्या जोपासावे याचा एक चांगल्या प्रकारे प्रबोधन करण्यात आले. यामध्ये पारिसरातील सर्व राजकीय, सामाजिक, लोकप्रतिनिधी, महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ, प्रतिष्ठान यांनी सहभाग घेतला.