पिंपरी (Pclive7.com):- आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर बेटिंग सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्तांना मिळाली. काळेवाडी परिसरात घरात सुरू असणाऱ्या ‘बेटिंग’वर गुंडा विरोधी पथकाने छापा मारून 27 लाख 25 हजार रुपये, आठ मोबाईल, बेटिंग खेळण्यासाठी-घेण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे.
आयपीएलच्या गुजरात टायटन आणि दिल्ली कॅपिटल या सामन्यांवर बेटिंग सुरु असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना मिळाली. काळेवाडी येथील एका सोसायटीमध्ये घरात सुरू असलेल्या बेटिंगवर गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख हरीश माने आणि त्यांच्या पथकाने छापा मारला.
घरात रंगेहाथ बेटिंग घेताना-खेळताना पोलिसांनी पकडले. मोठ्या प्रमाणात पैसे आणि इतर साहित्य आढळून आले. दरम्यान पोलीस कारवाई करत असताना यातील आरोपी सनी उर्फ भूपेंद्रसिंह गिल (38, रा. राजवाडेनगर, काळेवाडी) याने सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
‘मला हात लावायचा नाही, माझी ओळख वरपर्यंत आहे, माझ्यावर कारवाई केल्यास चांगले होणार नाही’ अशी धमकी देत पोलिसांसोबत झटापटी करत कारवाई करताना अडथळा निर्माण केला. पोलिसांनी या प्रकरणी वेगळा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी हजरतअली पठाण यांनी फिर्याद दिली असून सनी गिल, रिकी राजेश खेमनानी (36, पिंपरी), सुभाष रामकिसन आगरवाल (57, रा. पिंपरी) या तिघांना अटक केली आहे तर सनी सुखेजा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यातील सनी गिल हा गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
आयपीएलच्या या सिझिनमध्ये शहरात पहिलीच मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे. कारवाईनंतर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रशांत अमृतकर हे घटनास्थळी पोहचले होते.