पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडच्या पोलिस आयुक्तपदाची सूत्रे अंकुश शिंदे यांनी आज (दि.२१) स्विकारली आहेत. अपर आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर अंकुश शिंदे यांनी पदभार स्विकारला आहे.
राज्य गृह विभागाने काल (दि.२०) संध्याकाळी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली झाली आहे. अंकुश शिंदे यांची पिंपरी चिंचवडचे नवे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कृष्ण प्रकाश यांची पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड येथून बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती विशेष पोलिस महानिरीक्षक (व्ही.आय.पी. सुरक्षा) महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे करण्यात आली आहे. दरम्यान, विशेष पोलिस महानिरीक्षक सुधार सेवा, मुंबई येथे कार्यरत असलेले अंकुश शिंदे यांची पिंपरी चिंचवडच्या पोलिस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अंकुश शिंदे हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे चौथे पोलीस आयुक्त आहेत. नवनियुक्त पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी हैदराबाद ट्रेनिंग व्यतिरिक्त लंडन येथील गुन्हेगारी आणि तेथील कार्यपद्धतीचा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काय गरजेचे आहे याचे विशेष ट्रेनिंग घेतले आहे. या ट्रेनिंगचा फायदा सोलापूर आणि अन्य ठिकाणी पोस्टिंग असताना कुणाच्या कशा मुसक्या आवळल्या पाहिजेत यासाठी शिंदे यांनी केला आहे. संघटित गुन्हेगारीवर चांगला “अंकुश” त्यांनी आत्ता पर्यंत ठेवला आहे. सोलापुरातील तत्कालीन नगरसेवकांवर तसेच व्हाईट कॉलर गुन्हेगारांवर त्यांनी केलेली कारवाई कायम चर्चेत राहिली आहे. मात्र, विशेष पोलिस महानिरीक्षक अंकुश शिंदे हे त्यांच्या पूर्ण कार्यकाळात प्रसिद्धीच्या झोतापासून कायम दूर राहिल्याचे दिसते.
रात्री-अपरात्री सार्वजनिक रस्त्याच्या कडेला, चौकात बसून गप्पा मारणारे व हुल्लडबाजी करणाऱ्यांवर आयुक्त शिंदे यांनी कारवाई केली होती. तसेच पोलिसांच्या बेशिस्त वर्तनावर त्यांचे विशेष लक्ष असायचे. उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमध्येही अशाच कारवाईची गरज आहे. राजकारण्यांना सुतासारखा सरळ करणारा युनिट कमांडर आणि कर्मचारी अधिकाऱ्यांच्या योग्य तसेच कायदेशीर कामाच्या पाठीशी राहणारे आयुक्त अशी अंकुश शिंदे यांची ओळख पिंपरी चिंचवडमध्ये कायम राहण्याची गरज आहे.