पिंपरी (Pclive7.com):- उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी (दि.३) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दुपारी दीडला राष्ट्रवादीच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यात पक्षाच्या कार्यकारणीची घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी मंगळवारी (दि.१) पत्रकार परिषदेत दिली.
निगडी येथे झालेल्या परिषदेला महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, शाम लांडे, विनोद नढे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, विनायक रणसुभे आणि पदाधिकारी उपस्थित होते.
शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी पिंपरी -चिंचवड शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. महापालिकेच्या शहरातील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पक्षाचा मेळावा चिंचवड येथे होणार आहे. त्यात शहराची कार्यकारणी घोषित केली जाणार आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिले जाणार आहे.
प्रशासकीय राजवट असताना आयुक्त राजेश पाटील यांनी नवीन प्रशासकीय इमारतीसाठी ३१२ कोटी खर्चाची निविदा प्रसिद्ध केली आहे. तो धोरणात्मक निर्णय आयुक्तांनी घेतला. तो निर्णय खटकणार आहे, असे गव्हाणे म्हणाले. तसेच, पाच वर्षांच्या कालावधी झालेल्या अनेक कामात भ्रष्टाचार झाला असून, त्यातील काही प्रकरणावर चौकशी लवकरच लागेल, असा दावा त्यांनी केला.