पिंपरी (Pclive7.com):- राज्यात काही ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परिणामी, पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढणार का? अशी चिंता सर्वत्र व्यक्त केली जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सद्य:स्थितीत कोरोना रुग्णांची संख्या धिम्या गतीने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता, पुरेशी काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
गेल्या वर्षी जानेवारीपर्यंत रुग्णांची संख्या कमी होती. परंतु, त्यानंतर मार्च ते मे या कालावधीत रुग्णांची संख्या वाढली. एप्रिल २०२१ मध्ये महिन्याभरात ७०,२८५, तर मेमध्ये ३९,९७६ रुग्णांची नोंद झाली होती. सद्य:स्थितीत शहरात १०५ सक्रिय रुग्ण आहेत.
त्यापैकी सर्व रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. एकही रुग्ण रुग्णालयात दाखल नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत सक्रिय असलेल्या सर्वच रुग्णांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत. यंदाच्या जानेवारीमध्ये देखील रुग्ण संख्या वाढली होती. जानेवारीमध्ये शहरात ६८,७८१ रुग्णांची नोंद झाली होती. परंतु, त्यानंतर रुग्ण संख्येचा आलेख दिवसागणिक कमी होत राहिला. सध्या शहरात एकही गंभीर रुग्ण नाही.
शहरात सद्यस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. शासनाने केलेल्या सूचनेनुसार कोरोना तपासण्याचे प्रमाण वाढविण्यात येणार आहेत. तसेच ज्या नागरिकांचे लसीकरण बाकी आहे. त्यांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. रुग्णांची संख्या वाढली तर महापालिका रुग्णालयातील एक वार्ड राखीव ठेवण्यात येईल, परंतु सध्या तरी दैनंदिन रुग्ण संख्या कमीच आहे.– डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य, वैद्यकीय अधिकारी
सद्यःस्थितीत शहरातील कोरोनाची आकडेवारी
एकूण रुग्ण – ३,५९,८६९
मृत्यू – ४,६२४
बरे झालेले – ३,५५,८७१
तपासण्या – २९,५१,५३९
सक्रिय रुग्ण – १०५
रुग्णालयात दाखल – ००
गृह विलगीकरणात – १०५