पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या गेल्या महासभेत अर्थसंकल्पावर बोलू न दिल्यामुळे शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभात्याग केला होता. त्यानंतर सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी विरोधक पळपूटे बांग्लादेशी असल्याचे वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद आजच्या सभेत उमटले. शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी सभेच्या सुरूवातीलाच पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याचा निषेध करत माफी मागण्याची मागणी केली. अखेर महापौरांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला.
आज झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. गेल्या महापालिका सभेत अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. त्यावेळी विरोधी पक्षनेते योगेश बहल, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले यांनी अर्थसंकल्पावर चर्चा होऊ देण्याची मागणी केली होती. मात्र सत्ताधारी भाजपने कोणतीही चर्चा होऊ दिली नव्हती. महापौर नितीन काळजे यांनी काही क्षणात अर्थसंकल्पाला मंजूरी दिली. त्यामुळे संतापलेल्या सर्वच विरोधी पक्षातील नगरसेवकांनी सत्ताधारी भाजपचा निषेध करत सभात्याग केला होता. त्यानंतर सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी विरोधकांच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावेळी पवार म्हणाले होते की, विरोधकांना सभागृह चालू द्यायचे नाही. आम्ही चर्चेस तयार होतो, मात्र शिवसेना-राष्ट्रवादीचे नगरसेवक पळपुटे बांग्लादेशी आहेत.
पक्षनेते एकनाथ पवार यांच्या त्या वक्तव्यावरून आजच्या सभेत चांगलाच गोंधळ झाला. सभेच्या सुरूवातीलाच शिवसेना गटनेते यांनी पक्षनेत्यांवर एकेरी भाषा वापरत हल्ला चढविला. त्यानंतर स्थायी सभापती सीमा सावळे पवारांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्यामुळे कलाटे आणि सावळे यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. अखेर महापौर यांनी पक्षनेत्यांनी मध्यस्थी करत या वादावर पडदा टाकला.