पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदी डॉ. अनिल रॉय यांच्याऐवजी डॉ. पवन साळवे यांना पदोन्नती देण्याच्या प्रस्तावाला विधी समितीने मान्यता दिली आहे.महापालिकेच्या महासभेसमोर हा प्रस्ताव मांडला जाणार असून याबाबत सत्ताधारी भाजप कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तत्कालीन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नागकुमार कुणचगी यांच्या सेवानिवृत्तीनंतर या पदासाठी पात्रता धारण करणारे डॉ. साळवे हे एकमेव वैद्यकीय अधिकारी महापालिकेच्या आरोग्य सेवेत कार्यरत होते. मात्र, सत्ताधारी राष्ट्रवादीने साळवे यांना डावलून अन्य अधिकाऱ्यांना या खुर्चीवर बसण्याची संधी दिली. त्यानंतर डॉ. अनिल रॉय यांनी पदावर कार्यरत असताना कोणतीही रजा न घेता पदव्युत्तर पदविका प्राप्त केली. त्यानंतरही साळवे यांना डावलून वैद्यकीय अधिकारीपदी बढती न देता या पदावर डॉ. रॉय यांची वर्णी लावण्यात आली. तर, यापूर्वीच डॉ. पवन साळवे यांच्या अतिरिक्त मुख्य वैद्यकीय अधिकारी पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता.
महापालिकेच्या आरोग्य सेवेतील मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी व अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी या दोन्ही पदांना समान वेतन असून, सेवा ज्येष्ठतेनुसार डावल्याने डॉ. साळवे यांनी अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक समिती व राज्य सरकारकडे याविरोधात दाद मागितली होती. त्यानंतर याबाबत राज्याच्या नगरविकास विभागाने पदोन्नतीचा फेरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. या विषयावर चर्चा करताना महापालिकेच्या सभागृहात राष्ट्रवादी व विरोधी नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतरही राष्ट्रवादीने डॉ. रॉय हेच या पदाकरिता पात्र असल्याचा प्रस्ताव पाठविला होता. मात्र या दोन्ही अधिकाऱ्यांच्या पात्रतेत असलेला फरक लक्षात आल्याने नगरविकास विभागाने पुन्हा नव्याने हा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.
या पदोन्नतीच्या घटनाक्रमात महापालिकेत सत्ता बदल झाल्याने, हा चेंडू सत्ताधारी भाजपच्या कोर्टात आला. हे दोन्ही अधिकारी वैद्यकीय सेवेतील असले, तरी देखील त्यांचे राजकीय लागेबांधे वरपर्यंत असल्याने नेमकी कोणाची साथ द्यावी, असा प्रश्न भाजप नगरसेवकांना पडला. विधी समितीपुढे आलेला विषय टाळण्यासाठी दोनवेळा समितीची बैठक गणसंख्येअभावी तहकुब करण्यात आली. समिती सदस्य मात्र, महापालिका मुख्यालयातच फिरत असल्याचे सभेच्या दिवशी दिसून आले. मात्र, कोणताही आर्थिक लाभ पदरात पडणार नसल्याचे लक्षात येताच, आज झालेल्या सभेत डॉ. पवन साळवे यांना पदोन्नती देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.