पुणे (प्रतिनिधी):- पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना पुन्हा एकदा धमकीचे पत्र मिळाले आहे. यापूर्वी नाव असलेल्या भुजंगराव मोहिते याच व्यक्तीच्या नावाने हे पत्र पाठवण्यात आले आहे. मागील पत्रापेक्षा आज पाठवलेल्या पत्रातील भाषा ही अधिक तीव्र स्वरूपाची असून, मुंढे यांच्यासह कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हिंदी आणि मराठी मिश्रित भाषेतील हे पत्र पोस्टाद्वारे पीएमपीएमएल कार्यालयात पोचले. या विरोधात पीएमपीएमएल प्रशासनाने स्वारगेट पोलिस ठाणे आणि पुणे पोलिस आयुक्तांना पत्र दिले आहे.
तुकाराम मुंढे यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात अत्यंत उर्मट भाषा वापरण्यात आली असून, पोलिसांच्या क्षमतेवरही त्यात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. मुंढे यांच्या कुटुंबातील चार-पाच व्यक्ती पूर्णपणे नाहीशा करण्याची भाषा यात करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण शहराला हादरवणाऱ्या जोशी, अभ्यंकर, बाफना, हेगडे हत्याकांडाचाही उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. एवढेच नाही तर हे हत्याकांड इतके भयंकर असेल की तुम्ही याची कल्पनाही करू शकणार नाही असा इशारा यात देण्यात आला आहे.