पिंपरी (प्रतिनिधी):- चिंचवड येथील विद्यानगर परिसरात दोन दिवसांपूर्वी डोक्यात दगड घालून एका सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आला होता. या खुनाचा छडा लावत पिंपरी पोलिसांनी तीन आरोपी व चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सुरज नवनाथ कांबळे (वय २२ रा. विद्यानगर, चिंचवड) आकाश तुकाराम तरस (वय १९ रा रामनगर,चिंचवड), ओंकार ब्रम्हदेव राजगुरु (वय.19 रा. बालाजीनगर एमआयडीसी भोसरी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून याबरोबरच पोलिसांनी या प्रकरणात चार अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे. यातील तीन आरोपींना चार ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा तपास करीत असताना संशयीत म्हणून सुरज कांबळे याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्याने उडवा उडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलीसी खाक्या दाखवताच त्याने खून केल्याचे कबूल केले. त्याने काही दिवसांपूर्वीच अल्पवयीन मुले व त्याचे दोन साथीदार यांच्यासह इम्रानच्या खुनाचा कट रचला.
इम्रान हा घटनेच्या रात्री दारु पिऊन बाहेर झोपला होता. यातील सुरज व ओंकार हे पेस्ट कंट्रोल कंपनीत काम करत असल्यामुळे त्यांना औषधाची माहिती होती. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला इम्रानला बेशुद्ध करणारे औषध पाजले त्यानंतर त्यांनी इम्रानला जवळच असलेल्या सार्वजनिक शौचालयाजवळ नेले व डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.
इम्रान आणि आरोपी यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्याचाच राग मनात धरुन इम्रानचा खून करण्यात आला. इम्रानवर खंडणी, तोडफोड व चोरीचे गुन्हे दाखल होते. तसेच तो परिसरातही ब-याचवेळा इतरांवर दादागिरी करत होता.
पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात प्रकरणाचा छडा लावला. ज्यामध्ये पोलिसांकडे सीसीटीव्ही किंवा कोणताच ठोस पुरावा हाती नव्हता. ही कामगिरी पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक मसाजी काळे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, बाळासाहेब अंतरकर, हरिदास बोचरे, पोलीस हवालदार शाकिर जिनेडी, राजेंद्र भोसले, विवेक सपकाळे, नागनाथ लकडे, प्रभाकर खणसे, गोरख थेऊरकर, पोलीस नाईक महादेव जावळे, संतोष दिघे, पोलीस शिपाई दादा धस, संतोष भालेराव, रोहित पिंजरकर यांनी केली.