पिंपरी (Pclive7.com):- भारतीय सर्प विज्ञान संस्थेचे अध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बहिणाबाई चौधरी उद्यानाचे माजी संचालक अनिल राजाराम खैरे (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने रविवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. सर्पतज्ज्ञ नीलिमकुमार खैरे हे त्यांचे ज्येष्ठ बंधू होत.
भारतीय सर्प विज्ञान संस्था कात्रज सर्पोद्यान आणि अनाथ प्राणी पक्षी अनाथालयचे व्यवस्थापन संस्था सांभाळते. या संस्थेचे अनिल खैरे अध्यक्ष होते. याच संस्थेच्यावतीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बहिणाबाई चौधरी उद्यानाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम सांभाळले होते.
बारावीनंतर आयटीआय शिक्षण घेऊन अनिल खैरे यांनी टेल्को कंपनीत काही वर्षे नोकरी केली. सर्प तज्ज्ञ नीलीमकुमार खैरे यांच्या प्रमाणेच त्यांना ही निसर्ग संवर्धनाची आवड निर्माण झाली. पुढे त्यांनी इंग्लंडमधील जर्सी वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्ट (सध्याची ड्यूरेल वाईल्ड लाईफ ट्रस्ट) येथे प्रशिक्षण घेतले होते. वन्य जीव वाचविण्यासाठी त्यांचा सक्रीय पुढाकार असायचा. कोंढवा भागात आलेला बिबट्या सुरक्षितरित्या पकडून निसर्गात सोडण्याची मोहीम त्यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. अशा प्रकारे अनेक मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग होता. हार्पिटन या नावाचे शास्त्रीय संशोधन निबंध असलेले नियतकालिक प्रसिद्ध करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.