पिंपरी (प्रतिनिधी):- कात्रज ते निगडी मेट्रो प्रकल्पाला वेळ लागत असल्यामुळे आणि ट्रँफीकचे नियोजन फसले असल्यामुळे व करदात्या सामान्य नागरिकांना ट्रँफीकच्या त्रासापासून मुक्तता मिळण्यासाठी महापौरांसह पदाधिकार्यांकरिता हँलिकॉप्टर खरेदीला आज झालेल्या महापालिका सभेत मंजूरी देण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त ‘अभिरूप’ सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर हे महापौरांच्या भूमिकेत होते. तर महापौर नितीन काळजे हे आयुक्त बनले होते. सा सभेची सुरूवात ‘या रावजी अन् बसा भाऊजी’ या गाण्याने झाली तर शेवट ‘झिंग..झिंग..झिंगाट’ गाण्याने करण्यात आला.
पिंपरी चिंचवड महापालिकेचा आज ३५ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. त्यानिमित्त महापालिकेत अभिरूप सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत नगरसेवक अधिकार्यांची भूमिकेत होते तर अधिकार्यांनी नगरसेवकांची भूमिका बजावली होती. आयुक्त श्रावण हर्डीकर महापौर झाले होते. तर अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे उपमहापौर, राजेश लांडे यांनी स्थायी सभापती, प्रविण तुपे सभागृह नेता बनले होते. तर दिलीप गावडे विरोधी पक्षनेते, नगरसचिव उल्हास जगताप यांनी अपक्ष गटनेत्यांची भूमिका पार पाडली. तसेच महापौर नितीन काळजे आयुक्त, उपमहापौर शैलजा मोरे अतिरिक्त आयुक्त, स्थायी सभापती सीमा सावळे मुख्य लेखापाल, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी नगरसचिवांची भूमिका पार पाडली.
आजची अभिरूप सभा ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. हास्याचे फवारे, एकमेकांची नक्कल, टाळ्यांचा कडकडाट या सभेत पहायला मिळाला. आजच्या या सभेत (मॉर्क पार्लमेंट) कार्यपत्रिका बनविण्यात आली होती.
पिंपरी चिंचवड महापालिकेतील कर्मचार्यांना शिस्त लागावी व भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून अधिकार्यांच्या टेबलवर सीसीटिव्ही कँमेरे बसविण्याच्या विषयाला मंजूरी देण्यात आली. नगरसेवकांना प्रभागात फिरण्यासाठी रिंगरोडची सेवा उपलब्ध करून सदस्यांना १ लाख मासिक भत्ता दरमहा अदा करण्यास मंजूरी देण्यात आली. या रिंगरोडवर टोलनाका बसवून त्याचे उत्पन्न नगरसदस्यांना देण्यात यावे ही उपसुचना देखील मंजूर करण्यात आली.
कात्रज ते निगडी मेट्रो प्रकल्पाला वेळ लागणार असल्यामुळे आणि ट्रँफीकचे नियोजन फसले असल्यामुळे व करदात्या सर्वसामान्य नागरिकांना ट्रँफीकच्या त्रासापासून मुक्तता मिळावी म्हणून रावेत ते पुणे महापालिका हा पर्यायी जलवाहतूक मार्ग स्वस्त व सुकर करण्याचा विषय मंजूरीसाठी होता. त्यावर आधी पवनेचे प्रदुषण दूर करा अशी सुचना संजय कुलकर्णी यांनी मांडली. यावेळी महापालिका मुख्यालयासह प्रत्येक प्रभाग इमारतीच्यावर हँलीपँड उभारण्याची उपसुचना करण्यात आली. हे एवढ्यावरच थांबले नाही तर महापौरांसह प्रत्येक पदाधिकार्याला हँलीकॉप्टरच खरेदी करण्याच्या उपसुचनेला मंजूरी यावेळी देण्यात आल्याने सभागृहात एकच हशा पिकला.
वास्तविक पाहता या अभिरूप सभेला काहीच महत्व नसते. कर्मचार्यांना दररोजच्या कामातून विरंगुळा मिळावा हाच उद्देश या सभेचा असता. दरम्यान या हास्यरूपी अभिरूप सभेत झालेल्या अजबगजब निर्णयाची चर्चा महापालिका वर्तुळात चांगलीच रंगली होती.