पिंपरी (Pclive7.com):- वाकड आणि हिंजवडी परिसरातील वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल बनला आहे. या भागातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पर्यायी रस्ते निर्माण करण्याची गरज ओळखून त्यादृष्टीने पावले उचलण्यात येत आहे. त्याची पहिली सुरवात पर्यायी दोन रस्त्याने करण्यात येणार आहे. वाकड येथील जकात नाका ते हिंजवडी आणि पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग ते हिंजवडी असे अनुक्रमे १२ आणि १८ मीटर रुंदीचे दोन पर्यायी रस्ते तयार केले जाणार आहेत, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.
यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, हिंजवडीत आयटी पार्क सुरू झाल्यानंतर या परिसरासह पिंपरी चिंचवडमधील वाकड, पिंपळेसौदागर, पिंपळेनिलख आणि पिंपळेगुरव या परिसरातील नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. वाढत्या नागरीकरणाबरोबरच हिंजवडीकडे जाणारे प्रमुख रस्ते विकसित करण्याचे काम पिंपरी चिंचवड महापालिकेने केले. मात्र आता हे प्रमुख रस्तेही अपुरे पडू लागल्यामुळे वाकड, हिंजवडी या भागातील सर्वच रस्त्यांवर दररोज होणाऱ्या वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल बनला आहे. त्यामुळे चाकरमान्यांसोबतच सामान्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
वाकड आणि हिंजवडी भागातील वाहतूक कोंडीचा विचार केल्यास प्रमुख रस्त्यांना जोडणारे पर्यायी मार्ग तयार करण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाबरोबर अनेकदा चर्चा केल्यानंतर विकास आराखड्यात अनेक पर्यायी रस्ते उपलब्ध असल्याचे समोर आले आहे. अशा सर्व रस्त्यांची माहिती घेतल्यानंतर ते विकसित करण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशाच प्रयत्नातून हिंजवडीकडे जाण्यासाठी दोन पर्यायी रस्ते निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांच्यासोबत अनेकदा बैठका घेऊन आणि चर्चेतून हे दोन रस्ते तयार करण्यासाठी आवश्यक गोष्टींची पुर्तता करण्यात आली आहे.
त्यानुसार वाकड जकात नाका ते हिंजवडी हा १२ मीटर रुंदीचा आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग ते हिंजवडी हा १८ मीटर रुंदीचा असे दोन रस्ते तयार केले जाणार आहेत. हे दोन्ही रस्ते वाकडपासून हिंजवडीकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गाला पर्यायी रस्ते असतील. त्यामुळे वाकड आणि हिंजवडी भागात होणारी वाहतूककोंडी काही प्रमाणात कमी होईल. हे दोन्ही पर्यायी रस्ते तयार करण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. स्थानिकांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनीही या रस्त्याला संमती दिली आहे.
हिंजवडीकडे जाण्यासाठी दोन पर्यायी रस्ते निर्माण करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. हे दोन्ही रस्ते लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. हिंजवडी आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील आसपासच्या परिसरात होणाऱ्या वाहतूककोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी आगामी काळात या भागातील प्रमुख रस्त्यांना पर्यायी रस्ते विकसित करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.