(संदेश पुजारी, Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता ‘काबिज’ करून शहरात भाजपने आपली ताकद दाखवून दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची त्यानुसार पक्षाने तयारी देखील सुरू केली आहे. मात्र पिंपरी विधानसभेत इच्छुकांची ‘भाऊगर्दी’ झाल्यामुळे नेमकी कुणाला उमेदवारी द्यायची यावरून पक्षश्रेष्ठींची चांगलीच ‘डोकेदुखी’ वाढणार आहे.
चिंचवड विधानसभा भाजपच्या ताब्यात आहे. लक्ष्मण जगताप हे या मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत. तर भोसरीत भाजपा संलग्न अपक्ष आमदार महेश लांडगे यांचा दबदबा कायम आहे. पिंपरीत गेल्या निवडणूकीत आमदार गौतम चाबुकस्वार यांनी शिवसेनेच्या तिकीटावर बाजी मारली होती. त्यांचे भाजपातील मंडळींशी असलेले सलोख्याचे संबंध पाहता भविष्यात ते भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे. त्याच प्रमाणे राष्ट्रवादी अन् भाजपच्या काठावर असलेले माजी आमदार आण्णा बनसोडे यांच्या भाजपा प्रवेशाची अटकळे देखील बांधली जात आहेत. तुर्तासतरी या दोन्ही आजी-माजी आमदारांनी त्यांच्या प्रवेशाबाबत कोणतेही भाष्य केले नसले तरी त्यांच्या चर्चेने भाजपाच्या गोठात मात्र कमालीची अस्वस्थता आहे.
दरम्यान, भाजपातील काही इच्छुकांनी पिंपरीतून आपल्या मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. त्यात स्थायी समितीच्या सभापती सिमा सावळे आघाडीवर आहेत. त्यांना भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे पाठबळ अाहे. त्यानुसार सावळे यांनी देखील रणनिती आखली असून मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. मात्र सावळे यांच्या उमेदवारीला खासदार अमर साबळे यांच्याकडून विरोध होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. साबळे यांनी त्यांची कन्या वेणू साबळे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केलेत. नुकताच ‘स्नेहमिलन दिवाळी फराळा’च्या निमित्त पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेऊन त्यांनी शक्तीप्रदर्शन केल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे युवा नेते अमित गोरखे यांनी देखील विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपले ‘मनसुबे’ स्पष्ट केले आहेत. गोरखे यांची भाजपातील वरिष्ठ नेत्यांशी असलेली जवळीक ही त्यांची बेरजेची बाजू मानली जात आहे. तसेच तरूण तडफदार चेहरा म्हणून ओळख असलेले माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे हे ही आपल्यापरीने चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.
त्यामुळेच भाजपाकडून एकीकडे बेरजेचे राजकारण केले जात असताना, पिंपरीतील उमेदवारीवरून पक्षश्रेष्ठींची ‘डोकेदुखी’ वाढणार हे नक्की…!