पिंपरी (Pclive7.com):- पत्नीला फ्लॅट दाखविण्याच्या बहाण्याने नेऊन एका बांधकामावरून ढकलून देत आत्महत्येचा बनाव रचणार्या आरोपी पती व त्याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नी मंदा पती देविदासच्या विवाहबाह्य संबंधाला अडथळा ठरत असल्याने तिची हत्या करण्यात आल्याचे समोर येत आहे.
देविदास याने विवाहबाह्य संबंधाला अडथळा ठरणार्या पत्नी मंदा हिला फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने नेऊन आळंदीजवळील चर्होली खुर्दच्या एका बांधकामावरून ढकलून दिले. यामध्ये अहमदनगरच्या मंदा देविदास पालवे (वय २८) या विवाहितेचा मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी पतीसह दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मयत मंदा पालवे यांचा भाऊ आदिनाथ गोरक्ष खेडकर (रा. चिंचपुरी हिझवे, ता. पाथर्डी, जि. नगर) यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संगनमताने कट रचून खून केल्याचा गुन्हा आरोपी देविदास तुकाराम पालवे आणि घुले या दोघांसह एका अल्पवयीन मुलावर दाखल करण्यात आला. आळंदी पोलिसांनी देविदास पालवे आणि घुले यांना अटक केली, तर अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेतले. अधिक तपास आळंदी पोलिस करत आहेत.