पिंपरी (Pclive7.com):- विधानसभा निवडणुकीचा उमेदवार कोण असावा हे आम्ही नव्हे, तर पार्लमेंटरी बोर्ड ठरवते व दिल्लीतून घोेषणा होते. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबात दुमत असण्याचे कारण नाही. हि निवडणुक बिनविरोध होण्यासाठी आम्ही विरोधी पक्षातील नेत्यांना विनंती करणार आहोत, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज बुधवारी (दि.२५) पत्रकार परिषदेत पिंपरी येथे सांगितले.
कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक येत्या दिनांक २६ फेब्रुवारी रोजी आहे. चिंचवड पोट निवडणुकीच्या पुर्व तयारीची बैठक पिंपरीत एका खासगी हॉटेलमध्ये झाली. या बैठकीत आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, विधान परिषदेच्या आदार उमा खापरे, कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक भाजपा संपर्क प्रमुख मुरलीधर मोहोळ, चिंचवड विधानसभेचे निवडणूक प्रभारी शंकर जगताप, अश्विनी जगताप, रिपाइं महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे आदि उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, लक्ष्मण जगताप हे केवळ आमदार नव्हते. ते पिंपरी-चिंचवड शहराचे लोकनेते होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांच्या निमित्ताने निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखांमध्ये बदल केला आहे.
कामाच्या दिवशी निवडणूक नको म्हणून व मतदानाचा टक्का वाढावा म्हणून दि. २७ फेब्रुवारी ऐवजी दि. २६ फेब्रुवारीला करण्याचे निवडणूक आयोगाने निश्चित केले आहे. भाजपाने गाफील न राहता तयारी करण्याची भूमिका कायम ठेवली आहे.
चिंचवडला जगताप कुटुंबियांमधूनच उमेदवार दिला जाईल, यात शंका नाही. मात्र, त्याबाबत भाजपाच्या पक्षशिस्तीप्रमाणे इच्छुकांची नावे प्रदेशाकडे पाठविली जाणार. त्यांनंतर प्रदेश कोअर कमिटी निर्णय घेत असते. कोअर कमिटी पार्लमेंटरी बोर्डाला नावे कळविते. त्यानंतर दिल्लीतून घोषणा होते. आम्ही संभाव्य उमेदवारांची नावे कोअर कमिटीकडे पाठवली आहेत, असेही पाटील यांनी सांगितले.
भाजपाकडून स्थानिक नेत्यांना जबाबदारींचे वाटप
निवडणूक झाल्यास शक्ती केंद्र आणि बूथ यंत्रणा सक्षम करण्यात आली आहेत. त्याची जबाबदारी संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांच्याकडे आहे. उमेदवारी अर्ज व अन्य २० खाती नेमली आहेत; त्याची जाबाबदारी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्याकडे सोपविली असून त्यांना नामदेव ढाके सहायक आहेत.
निवडणूक बिनविरोध होण्यासाठी ‘पोलीटीकल लायजनींग कमिटी’ प्रमुख पदी शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांची नेमणूक केली आहे. कसबा व चिंचवड निवडणूक प्रचार प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांची नेमणूक केली आहे.