पिंपरी (Pclive7.com):- निवडणूक विभागाच्या तपासणी पथकाने आज चिंचवड मधील दळवीनगर चेक पोस्टवर ४३ लाख रूपयांची रक्कम पकडली. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवड मतदारसंघात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या वेळी चारचाकी वाहनांची तपासणी करताना ही कारवाई करण्यात आली.
चिंचवडमध्ये सकाळी साडेदहाच्या सुमारास चेक पोस्टवर एका चारचाकी वाहनातून ४३ लाख रुपयांची रोकड घेऊन जात असताना तपासणी दरम्यान दिसले. एवढी मोठी रक्कम कुणाची व कुठे जात होती याची तपासणी निवडणूक आयोगाचे तपास पथक करत आहे. संबंधित वाहचालक व्यावसायिक असून माझ्या मेडिकल व्यावसायाची ही रक्कम बँकेत भरण्यासाठी जात असल्याचे चालक सांगत होता. मात्र याची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.