पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी विरोधात बंडखोरी केलेल्या राहुल कलाटे यांच्यावर पक्षाकडून कारवाई होणार असल्याचे संकेत शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी दिले आहेत.
महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पदाधिकार्यांची बैठक काळेवाडी फाटा येथील हॉटेलमध्ये आज संपन्न झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार आदी उपस्थित होते.
राहुल कलाटेंच्या बंडखोरीबाबत सचिन अहिर यांना विचारले असता ते म्हणाले की, मुळामध्ये ते फक्त गटप्रमुख होते आणि नगरसेवक होते. त्यांच्याकडे दोन्ही पद राहिलेलं नाही. सेना भवनातून त्यांच्यावर पुढील कारवाईची प्रक्रिया केली जाईल. पक्ष म्हणून इथून पुढे त्यांचा कोणताही संबंध राहणार नाही. राहुल कलाटे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे सर्वप्रथम त्यांच्यावर कारवाई होईल. इतर त्यांच्यासोबत जे असतील त्यांच्याशी सर्वप्रथम चर्चा केली जाईल. तडकाफडकी कोणतीही कारवाई होणार नाही. यात सर्वांची समजूत घालण्याचा आम्ही प्रयत्न करू, त्यांच्यासोबत गेलेल्यांची संख्या फक्त पाच ते दहा टक्केच आहे. जे कोणी नगरसेवक त्यांच्यासोबत असतील त्यांच्याशी मी स्वतः चर्चा करेल. त्याही पलीकडे जाऊन त्यांनी कोणती भूमिका घेतली तर पुढे महानगरपालिका निवडणुका आहेतच असे सचिन अहिर यांनी म्हटले आहे.