पिंपरी (Pclive7.com):- एखाद्या कल्पकतेने अस्वच्छ जागा ही कशी सुंदर आणि विलोभनीय दिसू शकते हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दाखवून दिले आहे. पिंपळे सौदागरमधील काटेवस्ती येथे एका मोकळ्या जागेवर कचरा टाकला होता. मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कल्पकतेमुळे ती अस्वच्छ जागा आज चक्क सेल्फी पॉईंट झाली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत क्षेत्रीय अधिकारी उमाकांत गायकवाड व सहाय्यक आरोग्य अधिकारी महेश आढाव, उपअभियंता स्थापत्य सुनील नरोटे, प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागरचे आरोग्य निरीक्षक प्रणय चव्हाण, रत्न सोनावणे, मिलिंद पोत्रे, बेसिक्स वॉर्ड इन्चार्ज सुखदेव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली टीम बेसिक्सचे प्रतिनिधी स्वराज कांबळे, कुंडलिक कांबळे, धम्मपाल मोरे, अनिकेत खरात, अक्षय पाटील, दिनेश चिंचोके यांनी ही कामगिरी केली आहे.

स्वछतेच्या बाबत पहिला क्रमांकाचे शहर बनविण्याचा ध्यास घेतलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या काही कल्पक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ज्या ठिकाणी लोक कचरा टाकायचे त्या जागेचा चेहरामोहराच बदलला आहे. आरोग्य विभगाच्या टीम ने त्या ठिकाणी सफाई करून कुंड्या व रांगोळ्या काढून ती जागा स्वच्छ ठेवली. त्या ठिकाणी अशा पद्धतीने कुंड्यांची रचना केली की एक सुंदर कलाकृती निर्माण झाली. त्याचप्रमाणे कचऱ्यातील टाकाऊ वस्तूंचा उपयोग करून त्यापासून शहराचे सौंदर्य वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.

टाकाऊ वस्तूंपैकी टायर फुटके माठ प्लास्टिकच्या बाटल्या यापासून तोफ बनवण्यात आली आहे. फुटलेल्या माठांना रंग-रंगोटी करून त्यात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. रात्रीच्या वेळी या झाडांवर विद्युत रोषणाई केली आहे. जेणेकरून तेथे कधी कचरा टाकला जात होता याची कल्पनाच कोणाला येणार नाही. या उपयोजनामुळे गेल्या काही दिवसांपासून तेथे कचरा टाकने तर दूरच उलट लोक तिथे सेल्फी काढू लागले असून या सुंदर परिसराचा आनंद घेत आहेत.
Tags: Health DepartmentPcmc newsPimple saudagarPimpri Chinchwad Municipal Corporationselfi pointआरोग्य विभागकचराड क्षेत्रिय कार्यालयपिंपरी चिंचवड महापालिकापिंपळे सौदागरसेल्फी पॉईंट






















Join Our Whatsapp Group