देहू (Pclive7.com):- श्री क्षेत्र देहू येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळा आज गुरुवार (दि.९) विविध कार्यक्रमांनी साजरा होणार असल्याची माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप नितीन महाराज मोरे यांनी दिली.
गुरुवार (दि.९) रोजी पहाटे तीन वाजता काकड आरतीने बीज सोहळ्याची सुरुवात झाली असून पहाटे चार वाजता सर्व विश्वस्त, वंशज व वारकरी भाविकांच्या उपस्थितीत शिळा मंदिरात महापूजा झाली आहे. पहाटे सहा वाजता वैकुंठस्थान मंदिरात संत तुकोबारायांची महापूजा देखील संपन्न झाली आहे.
सकाळी साडेदहा वाजता वैकुंठस्थान मंदिराकडे पालखीचे प्रस्थान होईल. सकाळी १० ते १२ हभप देहूकर महाराज यांचे वैकुंठ सोहळा कीर्तन होणार आहे. दुपारी साडेबारा वाजता पालखीचे पुन्हा मुख्य मंदिराकडे प्रस्थान होणार आहे. बीज सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या भाविकांची देहनगरीत गर्दी झाली आहे.
बीज उत्सवानिमित्त गुरुवारी वैकुंठस्थान बीजोत्सव कीर्तन, दि. १२ रोजी वैकुंठस्थान पंचमी कीर्तन, दि. १३ रोजी काला गोपाळपुरा कीर्तन, दि. १४ रोजी कीर्तन व रात्री १२ वाजता महाद्वार काला लळीत निघेल व दि. १५ रोजी महाप्रसादाने सांगता होईल.