पिंपरी (Pclive7.com):- चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे थकित मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी आता दोन दिवस रात्री नऊपर्यंत करसंकलन केंद्रे (कॅश काऊंटर्स) सुरु राहणार आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशीसुध्दा थकित मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी कॅश काऊंटर्स सुरु राहणार असल्याने नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याचे करआकारणी व करसंकलन विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.

अवैध बांधकामावरील शास्तीमाफीची सवलत ३१ मार्च पर्यंतच असल्याने नागरिकांनी आपला मूळ कराचा भरणा विभागातील कॅश काऊंटर्स मध्ये जाऊन व ऑनलाईन स्वरुपात करण्याचे सुध्दा आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबरच नागरिकांनी थकित कर भरुन दररोज वाढणारे विलंब शुल्क टाळावे व सवलतीचा फायदा घ्यावा, असेसुध्दा आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.

करआकारणी व करसंकलन विभागाने आतापर्यंत 785 कोटींची विक्रमी वसूली केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झिरो टॉलरन्स पॉलिसीनुसार कडक कारवाईमुळे 785 कोटी रुपयांचा टप्पा गाठण्यात आला आहे. तरी नागरिकांनी येत्या दोन दिवसांमध्ये थकित कराचा भरणा करावा. असे आवाहन महापालिकेद्वारे करण्यात येत आहे.– नीलेश देशमुख,सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका