कर संकलन विभागाच्या भरघोस सवलतीचा लाभ घ्या; महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे आवाहन
पिंपरी (Pclive7.com):- औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराची ‘स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी’कडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये ‘इको फ्रेंडली’ सोसायटी करण्याकडे कल दिवसेंदिवस वाढत आहे. याच अनुषंगाने शहरातील जास्तीत जास्त सोसायट्या, स्वतंत्र घरे ‘इको फ्रेंडली’ व्हावेत यासाठी महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने सामान्य करात भरघोस अशी सवलत जाहीर करण्यात आली आहे. या सवलतीचा पर्यावरण पूरक सोसायट्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नाचा मालमत्ता कर मुख्य स्त्रोत आहे. महापालिका हद्दीत 5 लाख 97 हजार 487 मालमत्ता आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षात या विभागाने महापालिकेच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात प्रथमच 817 कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यानुसार 2023-24 या आर्थिक वर्षातही जास्तीत जास्त कराची वसुली करण्यासाठी कर संकलन विभागाने विविध भरघोस अशा सवलती जाहीर केल्या आहेत.
गतवर्षी 12 हजार पर्यावरण पूरक सदनिका धारकांना 65 लाख रुपयांची सवलत देण्यात आली आहे. मात्र, शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये ऑनसाईट कंपोस्ट, झिरो वेस्ट आणि एसटीपी असे पर्यावरण पूरक उपक्रम राबविले जात आहेत. याबद्दल सोसायट्यांना किंवा स्वतंत्र घर असणाऱ्यांना या पर्यावरण पूरक योजनांची माहिती नसल्यामुळे सवलतीपासून वंचित राहत आहेत. गतवर्षी पासून अशा सोसायट्यांना ऑनलाईन अर्ज करून लाभ घेता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यावर्षी देखील ऑनलाईन अर्ज स्विकारले जात आहेत. त्यामुळे शहरातील मालमत्ता धारकांनी अथवा सोसायटी धारकांनी कंपोस्टींग यंत्रणा, एस.टी.पी. प्लांट, तसेच झिरो वेस्ट यंत्रणा कार्यान्वित केली असल्यास त्यांनी तत्काळ महापालिकेच्या संकेतस्थळावर जावून अर्ज करावेत, असे आवाहन कर संकलन व कर आकारणी विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.
कंपोस्टींग यंत्रणा. एस.टी.पी. प्लांट, तसेच झिरो वेस्ट संकल्पना राबविणाऱ्या इमारतीमधील निवासी मालमत्ता धारकांना महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने भरघोस अशी सवलत जाहीर करण्यात आली आहे.
निवासी मालमत्ता धारकांना अशी आहे भरघोस सवलत..
1) ऑनसाईट कंपोस्टींग यंत्रणा कार्यान्वित असल्यास (ओला कचरा पूर्णतः जिरविणाऱ्यांना) – 5 टक्के
2) एसटीपी कार्यान्वीत असल्यास – 3 टक्के
3 ) ऑनसाईट कंपोस्टींग यंत्रणा आणि
एसटीपी कार्यान्वीत असल्यास – 8 टक्के
4) झिरो वेस्ट संकल्पना राबविण्यात येत असलेल्या (ओला व सुका कचरा पूर्णतःजिरविणाऱ्या) – 8 टक्के
5) झिरो वेस्ट आणि एस.टी.पी. कार्यान्वीत असल्यास (ओला व सुका कचरा पूर्णतः जिरविणाऱ्या) – 10 टक्के अशी भरघोस सवलत जाहीर करण्यात आली आहे.
पर्यावरण पूरक सवलतीचा लाभ घेण्यासाठी निवासी मालमत्ता धारकांनी प्रथम ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. सदर सवलत रक्कम वगळता उर्वरीत संपूर्ण रक्कम एकर कमी भरणा करणे अनिवार्य आहे. यंत्रणा कार्यान्वित नसेल तेव्हा त्या वर्षापासून सवलत रद्द होईल. चुकीची सवलत घेतल्यास वसूलीस पात्र असणार आहे.– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक
सवलत घेण्यासाठी असा करा अर्ज..
प्रथम महापालिकेच्या Pcmc या संकेतस्थळावर जावे > नागरिक > मिळकत कर > मालमत्ता करातील विविध सवलत योजना यावर क्लिक करून अर्ज भरावा.