पिंपरी (Pclive7.com):- किवळे येथील अनधिकृत होर्डिंग अंगावर पडून पाच जणांचा मृत्यू झाला. यावरून पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनावर चौफेर टीका झाल्यानंतर शहरातील अनधिकृत होर्डिंगचा विषय गंभीर बनला आहे. पुणे महापालिकेने तातडीने अनधिकृत होर्डिंगवर कारवाई सुरू केली होती. त्यापाठोपाठ आता पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही शहरातील अनधिकृत होर्डिंग काढण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने गुरुवारी (दि.२०) चार होर्डिंग काढून टाकले आहेत.
होर्डिंग दुर्घटनेनंतर अनधिकृत व अधिकृत होर्डिंग आणि जाहिरात फलकांबाबत महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी बुधवारी (दि.१९) जाहिरात व्यावसायिकांची बैठक घेतली. अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंगधारकांना सुरक्षेबाबत निर्देश दिले. त्यानंतर पालिकेने कारवाई सुरू केली.
शहरातील दिघी-आळंदी रस्त्यांवरील तसेच किवळे, रावेत येथील चार अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात आली. तर, होर्डिंगधारकांना होर्डिंग काढण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली असून, त्यानंतर फौजदारी कारवाई सुरू करण्यात येणार आहे. अद्याप पोलिसांकडे तक्रार केलेली नाही, असे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.