महापालिकेच्या धर्तीवर ऑनलाईन निविदा प्रक्रिया राबविण्याची माजी उपमहापौर तुषार हिंगे यांची मागणी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील पिंपरी-चिंचवड विज्ञान केंद्र (सायन्स पार्क) आणि तारांगण येथील कॅन्टीनच्या निविदा महापालिकेप्रमाणे ऑनलाईन प्रसिद्ध न करता संबंधित सायन्स पार्क व तारांगणच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून लिफाफा पद्धत राबविण्यात आली आहे. मर्जीतील ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून हा खटाटोप सुरू असल्याची तक्रार भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तथा माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या वैभवात भर घालणारे महापालिकेचे सायन्स पार्क आणि तारांगण आहे. तेथे दररोज हजारो विद्यार्थी व नागरिक भेट देतात. तेथील कॅन्टीन/ रेस्टॉरंट/ कॅफेटेरिया आदीसाठी 6 मार्च 2024 ला निविदा काढण्यात आली. ती निविदा सायन्स पार्क आणि तारांगणच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महापालिकेप्रमाणे ऑनलाईन निविदा प्रक्रिया राबविणे अपेक्षित असतााना ती प्रक्रिया लिफाफा पद्धतीने राबविण्यात आली आहे. या प्रक्रियेमध्ये अनेकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यातून सायन्स पार्कचे व्यवस्थापन मर्जीतील एखाद्या व्यक्तीस किंवा संस्थेला लाभ देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. लिफाफा पद्धतीने राबविण्यात आलेल्या या प्रक्रियेदरम्यान अनुचित प्रकारे बदल घडविण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय निर्माण होत आहे.
तरी, या प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी ती निविदा प्रक्रिया रद्द करून महापालिकेप्रमाणे ऑनलाईन निविदा काढावी, अशी मागणी तुषार हिंगे यांनी केली आहे.



























Join Our Whatsapp Group