पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय, प्रभाग क्रमांक २४ अंतर्गत येणाऱ्या रॉयल कॅसल सोसायटी, थेरगाव येथे दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी स्वतंत्र भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या मंगलमय प्रसंगी विविध पर्यावरणपूरक उपक्रमांसह उत्साहात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरुवात क्षेत्रीय अधिकारी तथा उपआयुक्त किशोरजी ननवरे सर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताच्या सुमधुर सुरांत उपस्थित नागरिकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना अर्पण केली. यावेळी सोसायटीतील पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर सोसायटीत नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या ग्रे वॉटर प्रकल्पाचे उद्घाटन उपआयुक्तांच्या हस्ते लाल फीत कापून करण्यात आले. या प्रकल्पामुळे सांडपाण्याचा पुनर्वापर करून पाणी बचतीस मोठा हातभार लागणार असून पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या प्रसंगी किशोरजी ननवरे सर यांनी रॉयल कॅसल सोसायटीच्या कार्याचे विशेष कौतुक करत, पर्यावरणपूरक उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी करणाऱ्या अशा सोसायट्यांना महानगरपालिकेकडून ‘५-स्टार सोसायटी’ म्हणून विशेष मानांकन दिले जाते, असे नमूद केले. तसेच रॉयल कॅसल सोसायटीने राबवलेल्या उपक्रमांच्या जोरावर लवकरच ५-स्टार मानांकन प्राप्त करावे, यासाठी त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

सोसायटीत राबविण्यात येणारे प्रमुख पर्यावरणपूरक उपक्रम..
# रॉयल कॅसल सोसायटीमध्ये खालीलप्रमाणे विविध पर्यावरणपूरक प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.
# कचरा व्यवस्थापन व कंपोस्टिंग प्रकल्प – ओल्या कचऱ्याचे खतामध्ये रूपांतर
# रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प – पावसाच्या पाण्याचे संकलन व पुनर्वापर
# एस.टी.पी. (सांडपाणी प्रक्रिया) प्रकल्प – सांडपाण्याची शुद्धीकरण प्रक्रिया
# ग्रे वॉटर प्रकल्प – वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर
# सौर ऊर्जा प्रकल्प – स्वच्छ व पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर
अशा प्रकारचे सर्वसमावेशक पर्यावरणपूरक उपक्रम राबवणाऱ्या सोसायट्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे ५-स्टार मानांकन देण्यात येते.
महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य..
या सर्व उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आरोग्य निरीक्षक सौ. स्नेहल सुकटे, मुकादम श्री. प्रशांत गोठे व मुकादम श्री. प्रदीप सोनवणे यांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल रॉयल कॅसल सोसायटीतर्फे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व विभागांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी मालमत्ता करात सवलत
पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) पर्यावरणपूरक उपक्रम राबवणाऱ्या सोसायट्यांना व वैयक्तिक सदनिका धारकांना मालमत्ता करामध्ये विविध प्रकारच्या सवलती देते. रेन वॉटर हार्वेस्टिंग, कंपोस्टिंग, सौर ऊर्जा, एस.टी.पी. प्रकल्प यांसारख्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्यास मालमत्ता कराच्या सामान्य करावर (General Tax) सवलत दिली जाते. तसेच एकापेक्षा अधिक उपक्रम राबविल्यास १० ते १५ टक्क्यांपर्यंत एकत्रित सवलत मिळू शकते.
























Join Our Whatsapp Group