पुणे (Pclive7.com):- बँकेचे कामकाज आठवड्यातील केवळ पाच दिवस करण्याच्या मागणीसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने मंगळवारी (दि.२७) देशव्यापी बँक संप पुकारला आहे. संपामध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी व कर्मचारी वर्ग सहभागी होणार आहेत.

पुणे येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेसमोर सर्व बँकांचे अधिकारी व कर्मचारी मंगळवारी निदर्शने करणार आहेत. मार्च २०२४ मध्ये झालेल्या द्विपक्षीय करारामध्ये सर्व बँकांचे कामकाज आठवड्यातील ५ दिवस करण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र, कराराला २ वर्षे उलटूनही अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे सर्व राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग स्विकारला असल्याचे स्टेट बँक वर्कर्स ऑर्गनायझेशनचे सरचिटणीस राजेश मुळे यांनी दिली.

बँक कर्मचारी वृंद सध्या कामाच्या प्रचंड तणावाखाली असून, पाच दिवसांचा आठवडा लागू करणे अनिवार्य झाले आहे. सर्व इन्शुरन्स, रिझर्व्ह बँक व शेअर मार्केटसह अनेक सरकारी तसेच निमसरकारी वित्तीय संस्थांमध्ये पाच दिवसीय कामकाजाची अंमलबजावणी होत असताना, बँकिंग क्षेत्रात मात्र दप्तर दिरंगाईमुळे तीव्र नाराजी आहे.
केंद्र सरकारने लवकरात लवकर पाच दिवसांचा आठवड्याची अंमलबजावणी न केल्यास, भविष्यात आणखी कठोर पावले उचलण्याचा इशारा मुळे यांनी दिला आहे.























Join Our Whatsapp Group