विद्यार्थ्यांच्या सहभागातून योग, आरोग्य आणि एकतेचा जागर..!
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका व आशा किरण सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वा जागतिक सूर्यनमस्कार महोत्सव मोरया गोसावी क्रीडांगण, केशवनगर, चिंचवडगाव येथे मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या महोत्सवात शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी एकत्र येत सूर्यनमस्कार सादर करून योग व उत्तम आरोग्याचा संदेश दिला.
या महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच प्राचीन भारतीय योगपरंपरेचा जागर करण्यात आला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी महापौर अर्पणा डोके, नगरसदस्य सुरेश भोईर, अनंत कोऱ्हाळे, उप आयुक्त पंकज पाटील,ममता शिंदे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते.
योगशिक्षक निर्मल गुप्ता, आशा किरण फाऊंडेशनचे अध्यक्ष रामकृष्ण पालमकर, वर्षा पवार, अविनाश गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सूर्यनमस्कार सादर करून शिस्त, समन्वय आणि एकतेचे दर्शन घडविले. सूर्यनमस्कार हा शरीरसामर्थ्य, लवचिकता, श्वसनशुद्धी आणि मानसिक स्थैर्य वाढविण्यास उपयुक्त असल्याचे मत यावेळी उप आयुक्त पंकज पाटील यांनी व्यक्त केले. तर नियमित सूर्यनमस्कार केल्यास तणावमुक्त जीवनशैली सहज साध्य होऊ शकते असे उप आयुक्त ममता शिंदे म्हणाल्या.

या कार्यक्रमात विविध मनपा माध्यमिक विद्यालयांनी आपला सहभाग नोंदवला. त्यामध्ये वाकड, उद्यमनगर, काळभोरनगर, केशवनगर, पिंपळे गुरव, संत तुकारामनगर, फुगेवाडी, पिंपळे सौदागर, थेरगाव, खराळवाडी, नेहरूनगर, रुपीनगर, श्रमिकनगर (निगडी), पिंपरी नगर, कासारवाडी, लांडेवाडी, किवळे, चिंचवड, चऱ्होली, पिंपळे निलख तसेच उर्दू माध्यमिक विद्यालय व त्यांच्या भाग शाळांचा सहभाग होता. क्रीडा अधिकारी रंगराव कारंडे, क्रीडा पर्यवेक्षक अरुण कडूस तसेच विविध विद्यालयांचे मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षकही यावेळी उपस्थित होते. यावेळी संपूर्ण क्रीडांगणात सकारात्मक ऊर्जा आणि उत्साही वातावरण अनुभवायला मिळाले यावेळी स्थानिक नागरिक देखील मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
सूर्यनमस्कार महोत्सव हा पिंपरी चिंचवड शहरासाठी आरोग्य, योग आणि सामाजिक एकात्मतेचा प्रेरणादायी आदर्श ठरला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्याबाबतही जागरूकता निर्माण झाली आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व घटकांनी एकत्र येत एकाच वेळी सूर्यनमस्कार सादर करणे हे शहरातील सामाजिक सलोखा आणि शिस्तीचे उत्तम उदाहरण आहे. अशा उपक्रमांमुळे निरोगी, सशक्त आणि सकारात्मक समाज घडविण्यास निश्चितच चालना मिळेल.
– पंकज पाटील, उप आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक अभ्यासासोबतच योग व शारीरिक स्वास्थ्य अत्यंत महत्त्वाचे आहे. सूर्यनमस्कारासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, एकाग्रता आणि सकारात्मक जीवनदृष्टी विकसित होते. अशा उपक्रमांमुळे निरोगी व सुसंस्कारित पिढी घडण्यास निश्चितच मदत होईल.
– ममता शिंदे, उप आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका






















Join Our Whatsapp Group