पिंपरी (Pclive7.com):- कोटीच्या कोटी उड्डाणे घेत तब्बल १०० कोटीच्या घरात पोहचलेला भोसरीत उड्डाणपूल आता चक्क कचऱ्यात गेल्याचे चित्र आहे. १०० कोटींच्या या पुलाबद्दल कित्येक रंजक स्वप्ने नागरिकांनी दाखविण्यात आली होती. पुलाखाली उद्यान, पे अँण्ड पार्क होणार, यामुळे या परिसराचा कायापालट होणार अशा बऱ्याच घोषणा झाल्या होत्या. परंतु हे सर्व काही कागदावरच राहिले असून नियोजना अभावी या पुलाखाली अक्षरशः कचराकुंडी निर्माण झाली आहे.
पिंपरी चिंचवड शहर एकीकडे स्मार्टसिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना भोसरीचे चित्र मात्र थोडे वेगळे दिसत आहे. गावठाणातून जाणारा भोसरीतील या उड्डाणपूलाकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासकीय नाकर्तेपणामुळे या पुलाखाली प्रचंड घाणीचे साम्राज्य वाढले आहे. जिथे उद्यान होणार होते तिथे कचराकुंडी नव्हे तर कचरा डम्पिंग ग्राउंड झाले आहे. ज्या उद्यानात नागरीक आनंदाने फिरणार होते तिथे आज मोकाट जनावरांचे वास्तव्य आहे. जिथे पे अँड पार्क करणार होते, तिथे सध्या अतिक्रमण झाल्यामुळे नागरिकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.