पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील शाळा-कॉलेज तसेच हॉस्पिटलच्या बाहेर सुरक्षिततेच्या कारणास्तव सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. याबाबत शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने महापालिका सहाय्यक आयुक्त डॉ.महेश डोईफोडे यांना निवेदन दिले.
यावेळी माजी नगरसेविका अश्विनी चिखले, विद्यार्थी सेना अध्यक्ष हेमंत डांगे, भोसरी विभाग अध्यक्ष अंकुश तापकीर, राजू सावळे, विष्णू चावरिया, अमित तापकीर, गणेश वाघमारे, प्रभुध्द कांबळे, राजू साठे आदी उपस्थित होते.
महापालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनाबाबत माहिती देताना सचिन चिखले म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहर कामगारांची नगरी आहे. दिवसेंदिवस शहराचा विस्तार तसेच लोकसंख्या वाढत आहे. वाढती गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शहरातील शाळा, कॉलेज आणि हॉस्पिटल हे केंद्रबिंदू आहेत. येथे रोडरोमीओ तसेच छोट्यामोठ्या गुंडाची दहशत वाढत आहे. मुलींच्या छेडछाडीच्या घटना वाढत आहेत. या ठिकाणांवर अनेक बेकायदेशीर प्रकार उघडपणे घडत असतात. या सर्व गैरप्रकारावर वचक तसेच करडी नजर ठेवण्यासाठी महापालिकेने सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी चिखले यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group