पिंपरी (Pclive7.com):- औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराला “क्रीडा नगरी” म्हणून नवी ओळख मिळावी, असे स्वप्न हजारो खेळाडू पाहत आहेत. मात्र, क्रीडा शिक्षकांना निवडणूक व इतर प्रशासकीय कामांमध्ये गुंतवले जात असल्याने खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.

याबाबत भाजपा क्रीडा शहराध्यक्ष अरुण पाडुळे यांनी प्रशासनावर टीका करत क्रीडा शिक्षकांना तात्काळ निवडणूक व इतर गैर-क्रीडा कामकाजातून मुक्त करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, “मैदानावर खेळाडू घडवणारे शिक्षक आज कागदोपत्री कामांमध्ये अडकले आहेत. यामुळे अनेक होतकरू खेळाडूंच्या स्वप्नांवर पाणी फिरण्याची शक्यता आहे.”

शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, महानगरपालिका शाळांमध्ये नवीन क्रीडा शिक्षकांची भरती तातडीने करावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. “आज निर्णय घेतला नाही, तर उद्याचे अनेक राष्ट्रीय खेळाडू घडण्याआधीच थांबतील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी नगरसेवक कुंदन गायकवाड, नगरसेविका योगिता नागरगोजे आणि सचिन सानप उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group